साने गुरुजी साहित्यनगरी., पुढारी वृत्तसेवा : काळ्या मातीला हिरवा शालू नेसवून आपल्या कवितेच्या माध्यमातून सेवा केलेले कवी ना. धों. महानोर, अहिराणी रचनेच्या माध्यमातून जीवनाचे मर्म मांडणार्या बहिणाबाई चौधरी यांसारख्यांनी खानदेशचे साहित्य समृद्ध केले. राजकारणातील लोकांना साहित्याचा गंध नसतो, असे म्हणता येणार नाही. साहित्यातून समाजात कसे वागावे, याची शिकवणूक मिळते. उत्तम साहित्यातून समाजसेवेची मूल्ये मिळतात, असे प्रतिपादन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, अमळनेर मराठी वाङ्मय मंडळ यांच्या वतीने आयोजित 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे सपत्नीक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने आदी उपस्थित होते.
महाजन म्हणाल्या, तळागाळातील लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण, समाजकारण केले जाते. मात्र, राजकारणी, समाजकारणी यांना प्रेरणा देण्याचे काम साहित्य करते. तुमचे मन शुद्ध असेल, तर तुम्ही जीवनात अयशस्वी होऊ शकत नाही.
मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, अशी भावना सगळ्या मराठी जनतेची आहे. तिला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी जशी शासनाची आहे, तशी आपल्या सर्वांची आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी हा भाषाभ्यासाचा क्रम बदलून मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असावा. गाव-खेड्यांतील गरिबांच्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे मत संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.