Latest

94 वर्षीच्या आजीने जिंकले जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : फिनलँडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेमध्ये 94 वर्षांच्या भगवानी देवी डागर यांनी 100 मीटर स्प्रिंट (वेगात चालणे) प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सर्वजण चकित झाले आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भगवानी देवी यांनी 100 मीटर अंतर 24.74 सेकंदांत पार केले. याशिवाय त्यांनी गोळाफेक प्रकारातही सहभाग घेतला होता. तिथेही त्यांनी कांस्य पदक मिळविले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या कामगिरीचे भरपूर कौतुक होत आहे. त्यांच्या धैर्याला आणि आत्मविश्वासाला लोकांनी सलाम केला आहे.

विशेष म्हणजे चेन्नई येथे झालेल्या नॅशनल मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही भगवानी देवींनी तीन सुवर्णपदके जिंकली होती. या कामगिरीच्या बळावर त्यांनी वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश मिळवला.

क्रीडा मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भगवानी देवींचा फोटो पोस्ट करून त्यांचे कौतुक केले आहे. मंत्रालयाने लिहिले, भारतातील 94 वर्षीय भगवानी देवी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की वय फक्त एक आकडा आहे. त्यांनी सुवर्ण आणि कांस्यपदके जिंकली. ही खरोखर साहसी कामगिरी आहे.

भगवानी देवींचा नातू विकास डागर हा देखील पॅराअ‍ॅथलीट असून त्याला 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. आता त्याची आजी असलेल्या भगवानी देवींनी पदके जिंकून आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.

SCROLL FOR NEXT