Latest

९०० कारागिरांनी १० लाख मनुष्य तास खर्ची घालत विणले नव्या संसदेतील गालिचे; एका इंचात १२० गाठी माराव्या लागल्‍या

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  नवीन संसद भवनातील लोकसभा आणि राज्यसभेत मान्यवर खासदार पाय ठेवतील तेव्हा त्यांच्या पायाखालचे आकर्षक व देखणे गालिचे त्या मागच्या श्रमांची कहाणी सांगतील. उत्तर प्रदेशातील 900 कारागिरांनी तब्बल 10 लाख मनुष्य तास खर्ची घालत अप्रतिम कलाकुसर असलेले हे गालिचे विणले आहेत.

संसदेच्या दोन्ही सभागृहांत असलेल्या गालिचांवर भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आणि राष्ट्रीय फूल कमळ या राष्ट्रीय प्रतीकांची नक्षी आहे. हे गालिचे ओबीटी कारपेट या 100 वर्षे जुन्या कंपनीच्या कारागिरांनी तयार केले आहेत. प्रत्येक सभागृहासाठी 17 हजार 500 चौरस फूट आकाराचे हे अर्धवर्तुळाकार गालिचे तयार करण्यात आले आहेत. 900 कारागिरांनी या गालिच्यांचे 150 हून अधिक तुकडे स्वतंत्र तयार केले व ते नंतर जोडून हे भव्य गालिचे तयार करण्यात आले. जोडताना हे स्वतंत्र तुकडे आहेत हे कोठेही जाणवू नये यासाठी त्याचे डिझाईनही त्याप्रमाणे तयार करण्यात आले व कसबी कारागिरांनी त्यांचे सारे कौशल्य पणाला लावत ही अफलातून कलाकृती साकारली आहे. राज्यसभेसाठी तांबूस रंगाच्या छटेचा तर लोकसभेसाठी हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला. हा गालिचा तयार करताना प्रति इंच 120 गाठी मारण्यात आल्या. थोडक्यात 60 कोटी गाठींच्या मदतीने हे गालिचे तयार झाले आहेत.

ओबीटी कारपेटचे चेअरमन रुद्रा चटर्जी म्हणाले की, 2020 साली कोरोनाची साथ सुरू असताना हे काम आम्ही हाती घेतले. गालिचे विणण्याचे काम प्रत्यक्ष सप्टेंबर 2021 मध्ये सुरू झाले आणि मे 2022 मध्ये संपले. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये प्रत्येक तुकडा जोडून गालिचे पूर्ण रूपात तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले.

SCROLL FOR NEXT