Latest

80 सीची मर्यादा संपल्यास…

Arun Patil

आर्थिक वर्षाखेर अर्थात 31 मार्च जवळ आला की, करदाते कर वाचवण्यासाठी धडपड सुरू करतात. अर्थात काही गुंतवणूकदार आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करबचत देणार्‍या योजनांमध्ये गुंंतवणूक सुरू करतात. परंतु, काही जणांची कोणत्या ना कोणत्या कारणाने करबचतीची गुंंतवणूक मागे पडू शकते. एवढेच नाही, तर काही करदात्यांची दीड लाखांपर्यंतची करसवलत देण्याची मर्यादाही उलटलेली असते. अशा वेळी करबचतीसाठी अन्य योजनांचा शोध सुरू केला जातो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सीनुसार दीड लाखांपर्यंतची कमाल मर्यादा गाठली असली तरी कलम 80 डीनुसार आणखी एक लाख रुपयांपर्यंतचा करसवलतीचा लाभ घेता येऊ शकतो.

या कलमान्वये आरोग्य विमा योजनेपोटी भरलेल्या हप्त्यावर अतिरिक्त करसवलत मिळते. या कलमातील तरतुदीनुसार पालकांच्या आरोग्य विम्यापोटी भरलेल्या हप्त्यांवर करसवलतीचा अतिरिक्त लाभ घेऊ शकता.

एक लाखापर्यंत वाचवा कर

साठपेक्षा कमी वयोगटातील लोकांच्या आरोग्य विम्यापोटी भरलेल्या हप्त्यांवर 25 हजारांपर्यंत करसवलत मिळवता येते. 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींसाठी ही मर्यादा 50 हजारांची आहे. याचाच अर्थ, आपले वय 60 पेक्षा कमी आणि आपल्या आईवडिलांचे वय 60 पेक्षा अधिक असेल तर आणि त्यांच्यासाठी आरोग्य विम्यापोटी हप्ता भरला असेल, तर कमाल 75 हजारांपर्यंत कर वाचवू शकता. त्याचप्रमाणे करदात्याचे वय 60 पेक्षा अधिक असेल तर तो स्वत: आणि आई वडिलांच्या आरोग्य विम्यापोटी भरलेल्या हप्त्यावर एक लाखांपर्यंत कर सवलत मिळवू शकतो.

कलम 80 डीनुसार वैयक्तिक योजनेनुसार मेडिक्लेम, फॅमिली फ्लोटर प्लॅन, क्रिटिकल इलनेस प्लॅन, लाईफ इन्श्युरन्स प्लॅनच्या हेल्थ रायडर्स आणि हेल्थ इन्श्युरन्सचे अन्य प्रकार यांवर करसवलत मिळवता येते.

हेही लक्षात ठेवा

केवळ कर सवलत मिळते म्हणून आरोग्य विमा घेऊ नये. कारण करबचतीपेक्षाही आरोग्य विम्याचे अधिक फायदे आहेत. आरोग्यावरचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णालयातील उपचाराचा खर्च हा आवाक्याबाहेर जात आहे. अशा वेळी आरोग्य विम्याच्या माध्यमातून पुरेसे सुरक्षा कवच घेणे गरजेचे आहे. कारण यामुळे बिकट स्थितीत बचत केलेली रक्कम संपणार नाही आणि पैशासाठी नातेवाईक किंवा मित्रांकडे जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी पुरेसा आरोग्य विमा असणे गरजेचे आहे.

जगदीश काळे

SCROLL FOR NEXT