Latest

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना; दुर्गा विसर्जनादरम्यान आलेल्या पूरात आठ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू असलेल्या दुर्गा मूर्तीच्या विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली. पश्चिम बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यातील माल नदीला अचानक आलेल्या महापूरात आठ जणांचा बुडून मृत्यू झाला. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीतून या घटनेची सध्यपरिस्थिती स्पष्ट झाली आहे. घटनेच्या वेळी दुर्गा मातेच्या विसर्जनासाठी माल नदीच्या काठावर शेकडो लोक जमले होते.

जलपाईगुडी जिल्हा दंडाधिकारी मौमिता गोदारा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, "नदीतील पाण्याचा जोर अचानक वाढल्याने लोक वाहून गेले. आतापर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ५० जणांना वाचवण्यात यश आले आहे. ते म्हणाले की किरकोळ जखमी झालेल्या 13 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) स्थानिक पोलिस आणि प्रशासन शोध आणि बचाव कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचे मागासवर्गीय कल्याण मंत्री बुलू चिक बराईक यांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. बारईक हे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते म्हणाले, अपघात झाला तेव्हा मी घटनास्थळी उपस्थित होतो. नदीचा प्रवाह वेगवान होता त्यामुळे अनेक लोक माझ्या नजरेसमोर वाहून गेले. घटनेच्या वेळी शेकडो लोक तेथे उपस्थित होते. बरेच लोक अजूनही बेपत्ता आहेत. बराईक आणि तृणमूल काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि राज्य प्रशासनाला बचाव कार्य जलद करण्याची विनंती केली आहे.

दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही व्यक्त केले दु:ख

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे दुर्गापूजेच्या उत्सवा दरम्यान झालेल्या दुर्घटनेमुळे मी व्यथित झालो आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मला दु:ख असल्याचे म्हणत त्यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT