Latest

Australia Womens Team : विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला 8.27 कोटी रुपयांचे बक्षीस!

रणजित गायकवाड

केपटाऊन, वृत्तसंस्था : Australia Womens Team : ऑस्ट्रेलिया संघाने महिला क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवत रविवारी सहाव्यांदा टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. त्यांनी आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर सलग सात वेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिसलेला ऑस्ट्रेलियन संघ सहा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला विजेतेपद जिंकल्यानंतर 8.27 कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळाली.

आयसीसीने महिला टी-20 विश्वचषक 2023 ची बक्षीस रक्कम आधीच जाहीर केली होती. या स्पर्धेत एकूण रु. 20.28 कोटी पणाला लागले होते, जे संघांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे दिले जाणार होते. अशा परिस्थितीत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 8.27 कोटी रुपये जमा झाले आहेत, तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला 4.13 कोटी रुपये मिळाले.

उपांत्य फेरीत पोहोचणार्‍या प्रत्येक संघाला 1.73 कोटी रुपये दिले गेले. ग्रुप टप्पा पार करू न शकलेले संघही रिकाम्या हाताने घरी परतले नाहीत. 24.83 लाख रुपयांव्यतिरिक्त, सर्व संघांना गट सामने जिंकण्यासाठी प्रति सामना 14.48 लाख रुपये मिळाले आहेत. त्यानुसार, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सुमारे 2.25 कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेसह परतला आहे.

महिला टी-20 विश्वचषक पुरस्कारांची यादी :

प्लेअर ऑफ द मॅच : बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया) : 74* धावा
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट : अ‍ॅश गार्डनर (ऑस्ट्रेलिया) : 110 धावा आणि 10 विकेटस्
सर्वाधिक धावा : लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका) : 230 धावा
सर्वाधिक बळी : सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) : 11 बळी
सर्वोच्च धावसंख्या : मुनीबा अली (पाकिस्तान) : 102 धावा
सर्वोच्च स्ट्राईक रेट : आयशा नसीम (पाकिस्तान) : 181.48
सर्वाधिक षटकार : लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका) : 5
सर्वाधिक चौकार : नॅट शिव्हर-ब्रंट (इंग्लंड) : 28
सर्वाधिक अर्धशतक : लॉरा वोल्वार्ड आणि बेथ मुनी : 3
सर्वोत्तम गोलंदाजी : अ‍ॅश गार्डनर (ऑस्ट्रेलिया) : 5/12

बेथ मुनी अंतिम फेरीतील सामनावीर ठरली

जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मुकुट सलामीवीर बेथ मुनीच्या डोक्यावर सजला. संपूर्ण स्पर्धेत शानदार फलंदाजी करणार्‍या मुनीने अंतिम फेरीत सर्वोत्तम खेळी केली. तिने 53 चेंडूंत नाबाद 74 धावांची खेळी करत संघाला 20 षटकांत 156 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या या धडाकेबाज खेळीमध्ये मुनीने 9 चौकार आणि 1 षटकार मारला. टी-20विश्वचषकाच्या इतिहासात सलग दोन फायनलमध्ये अर्धशतके झळकावणारी मुनी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. या शानदार खेळीसाठी तिला अंतिम फेरीतील सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT