Latest

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ७९.२५ टीएमसी पाणीसाठा

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जुलै महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यात सहा ऑगस्टपर्यंत प्रमुख 15 धरणांत 79.25 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आजअखेर धरणात 8.13 टीएमसी जादा पाणीसाठा झाला आहे.

यावर्षी जिल्ह्यात म्हणावा तसा वळीव झालाच नाही. यामुळे शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली. परिणामी जून महिन्याच्या प्रारंभीच धरणांनी तळ गाठला होता. त्यात जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांसह प्रशासनाचीही चिंता वाढली. मात्र जुलैमध्ये झालेल्या पावसाने जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांत समाधानकारक पाणीसाठा झाला.

जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांची एकूण 91.76 टीएमसी इतकी पाणी क्षमता आहे. यावर्षी 6 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेपर्यंत या प्रमुख 15 धरणांत एकूण 79.25 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

गतवर्षी याच दिवसापर्यंत हा पाणीसाठा 71.72 टीएमसी इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 8.13 टीएमसी जादा पाणीसाठा झाल्याने जिल्ह्याची चिंता मिटली आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी राधानगरी धरण यावर्षी जुलै महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले. गेल्या 13 वर्षांत चौथ्यांदा यावर्षी धरण लवकर भरले आहे. राधानगरीसह कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, कोदे ही सात धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. वारणा, दूधगंगा, कुंभी, कासारी आणि पाटगाव ही धरणेही 80 टक्याहून अधिक भरली आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणे सरासरी 86.36 टक्के भरली आहेत. गतवर्षी हीच टक्केवारी 77.50 टक्के इतकी होती.

SCROLL FOR NEXT