न्यूयॉर्क : मागील अनेक महिन्यांपासून कित्येक देशांत सातत्याने छोटे-मोठे भूकंप होत आहेत. यादरम्यान, यूएस जिओलॉजिकल सर्व्हेमधील एका अभ्यासातून जाहीर केला गेलेला निष्कर्ष अतिशय धक्कादायक असाच आहे. या अभ्यासात असे म्हटले आहे की, अमेरिकेचा 75 टक्के भूभाग भूकंपप्रवण ठरू शकतो.
अभ्यासकांनी यात 350 नवे फॉल्ट लाईन शोधून काढले आहेत. याचाच अर्थ असा आहे की, आतापर्यंत अमेरिकेत ज्ञात फॉल्ट लाईनची संख्या 1 हजारपर्यंत पोहोचली आहे. या फॉल्ट लाईन्समध्ये अमेरिकेतील अनेक शहरे येतात. याचा सर्वाधिक धोका कॅलिफोर्निया, अलास्का व हवाई या शहरांना असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
याशिवाय, गोल्डन स्टेटमधील काही भागात पुढील 100 वर्षांच्या कालावधीत भूकंप होण्याची 95 टक्के शक्यता असल्याचा यात उल्लेख आहे. यूएसजीएस सर्व्हेमधील निरीक्षणानुसार, इमारतींना धक्का पोहोचल्याने होणारे एकूण नुकसान 14.7 बिलियन डॉलर्सपेक्षाही अधिक असू शकते, अशी भीती व्यक्त केली गेली आहे.