Latest

राष्ट्रवादीचा ७० हजार कोटींचा घोटाळा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्‍लाबाेल

Arun Patil

भोपाळ, वृत्तसंस्था : विदेश दौर्‍यावरून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपविरुद्ध वज्रमूठ आवळणार्‍या विरोधी पक्षांवर मंगळवारी जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे, असा घणाघात करीत सर्व विरोधी पक्षांच्या घोटाळ्यांची गोळाबेरीज केली, तर 20 लाख कोटींचा हा घोटाळा होईल, अशी मला खात्री आहे, अशा शब्दांत मोदी यांनी विरोधी पक्षांची पिसे काढली.
समान नागरी कायद्याबाबत मोदी यांनी भाष्य केले. विरोधकांकडून जाणीवपूर्वक निर्माण केला जात असलेला संभ्रम भाजप दूर करेल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी आज दिली. इस्लामचा तिहेरी तलाकशी काहीही संबंध नाही. त्याला पाठिंबा देणारे निव्वळ मतांसाठी आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी उबगवाणे राजकारण करत असल्याचा घणाघात केला. एक घर दोन कायद्यांवर चालूच शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी येथील मोतीलाल नेहरू स्टेडियमवर भाजप कार्यकर्त्यांना आभासी पद्धतीने मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पंतप्रधानांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आरंभ केला. 'माझे बूथ, सर्वात मजबूत' या मोहिमेंतर्गत 543 लोकसभा आणि मध्य प्रदेशातील 64 हजार 100 बूथच्या 10 लाख कार्यकर्त्यांना मोदी यांनी संबोधित केले. यावेळी सर्व राज्यांच्या विधानसभा मतदारसंघांमधील तीन हजार कार्यकर्ते उपस्थित होते.

समान नागरी कायद्याचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत स्पष्टपणे करण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हा कायदा लागू करण्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे. समान नागरी कायदा देशातील सर्व राज्यांत लागू करावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केलेली असल्याचे मोदी यांनी निदर्शनास आणून दिले. राजकीय स्वार्थासाठी काही हितसंबंधी घटक या कायद्याला विरोध करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बिहारमधील विरोधकांच्या बैठकीवरही मोदींनी सडकून टीका केली. पाटण्यातील बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या विरोधकांच्या घोटाळ्यांचा आकडा एकत्र केला, तर तो 20 लाख कोटींचा घोटाळा होण्याची खात्री आहे, असा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलताना ते म्हणाले, या पक्षावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खोदकाम घोटाळा, अशी ही यादी मोठी आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असताना झालेल्या घोटाळ्यांचा दाखला देत मोदींनी हा हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी काँग्रेसने टू-जी, राष्ट्रकुलसह अनेक घोटाळे केले आणि ती रक्कम लाखो कोटींची आहे. त्याखेरीज तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, द्रमुक या पक्षांच्या भ्रष्टाचारावरही मोदी यांनी आसूड ओढले.

मोदी पुढे म्हणाले, तिहेरी तलाक हा केवळ मुस्लिम महिलांवर होणारा अन्याय नसून त्यामुळे संपूर्ण कुटुंब अडचणींच्या खाईत सापडते. जगभरातील विविध मुस्लिम देशांमध्ये तिहेरी तलाक संपुष्टात आला आहे. मी नुकताच इजिप्त दौर्‍यावर होतो. तेथे 90 टक्के लोक सुन्नी आहेत. त्यांनी कैक वर्षांपूर्वी तिहेरी तलाकची प्रथा संपुष्टात आणली आहे. तिहेरी तलाक जर इस्लामचा इतका महत्त्वाचा पैलू होता, तर मग पाकिस्तान, इंडोनेशिया, कतार, जॉर्डन, सीरिया आणि बांगलादेशात तिहेरी तलाक का नाही, असा खडा सवाल मोदींनी विचारला.

शरद पवारांच्या मुलीचे भले करायचे असेल तर मते द्या : नरेंद्र मोदी

विरोधी पक्षांकडून केवळ तुष्टीकरणाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप करून मोदी म्हणाले, जर तुम्हाला शरद पवार यांच्या मुलीचे भले करायचे असेल, तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करा. गांधी कुटुंबाचे कल्याण करायचे असेल, तर काँग्रेसला मतदान करा. अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, करुणानिधींचे कुटुंब, के. चंद्रशेखर राव, फारूख अब्दुल्ला आदी मंडळींचे उखळ पांढरे करायचे असेल, तर या मंडळींना मते द्या. मात्र, जर तुम्हाला देशाचा, तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा चौफेर विकास करायचा असेल तर भाजपला पर्याय नाही, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT