नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील 60 कोटी लोक जोडले जातील. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपने अवघा देश 22 जानेवारीला राममय व्हावा म्हणून एक महाआराखडा तयार केला आहे. देशातील सर्वच मंदिरांतून या दिवशी घंटानाद होणार आहे.
रामलल्ला अयोध्येत प्राणप्रतिष्ठित होतील, पण त्याचे प्रतिध्वनी देशभर आणि जगभर उमटतील. प्राणप्रतिष्ठेचा दिवस आणि त्यानंतरच्या 2 महिन्यांसाठी संघ आणि विहिंपने खूप आधीपासून तसे नियोजन करून ठेवलेले आहे. उत्तर प्रदेशसह देशातील सर्व मठ-मंदिरांतून पूजाअर्चनेसह देशातील 5 लाख गावे या आयोजनाशी संलग्न करण्यात आली आहेत. प्रत्येक माध्यम प्लॅटफॉर्मवरून प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रसारण होणार आहे. 10 कोटींवर कुटुंबांना अक्षतवितरण केले जाईल. भाजपच्या सर्व आमदार-खासदारांची तसेच अन्य सर्वच लोकप्रतिनिधींची, पदाधिकार्यांची विविध मंदिरांतून ड्यूटी लावण्यात आलेली आहे.
अयोध्या ठरणार व्यग्र रेल्वेस्थानक
पुढच्या 2 महिन्यांत देशभरातून जवळपास 1500 प्रवासी रेल्वेगाड्या अयोध्या रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहेत. या अर्थाने हे स्थानक देशातील सर्वाधिक व्यग्र स्थानक बनलेले असेल. 23 जानेवारी ते 25 मार्चदरम्यान संघ, विहिंप आणि भाजपने देशातील एक कोटींवर रामभक्तांना अयोध्या दर्शन करविण्याची योजना आखलेली आहे. सर्व रेल्वेगाड्या त्यासाठी आरक्षित आहेत. विशेष रेल्वेगाड्याही चालविल्या जातील.