नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसंबंधी एबीपी-सी व्होटर्सच्या सर्व्हेत आगामी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची सरशी होईल, असा अंदाज व्यक्त झाला आहे. राहुल गांधी यांच्याबरोबरच्या थेट लढतीत मोदी यांना 59 टक्के पसंती मिळाली आहे.
पुन्हा मोदींनाच संधी मिळाली पाहिजे आणि देऊ, असे या 59 टक्के लोकांचे म्हणणे होते. 32 टक्के लोकांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आपली पसंती असल्याचे मत नोंदविले. दोघांपैकी कुणालाही निवडणार नाही, अशी 4 टक्के मते होती. पाच टक्के लोकांनी या प्रश्नाला माहीत नाही, असे उत्तर दिले.
राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबाबतच्या प्रश्नावर 39 टक्केलोकांनी असमाधानकारक, असे उत्तर दिले. उत्तम, असा शेरा 26 टक्के लोकांनी मारला. 21 टक्के लोकांनी बरा, असा शेरा दिला. 14 टक्के मते माहिती नाही, या रकान्यावर पडली. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने 41 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. एबीपी-सी व्होटर्सने 2024 च्या निवडणुकांसंदर्भात केलेल्या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रात 44 टक्के लोकांनी उत्तम, असे मोदींच्या कारकिर्दीचे वर्णन केले आहे. 30 टक्के लोकांनी समाधानकारक म्हटलेले आहे. 25 टक्के लोक असमाधानी आहेत.
महायुतीला 19 ते 21 जागा
आता निवडणूक झाल्यास महाराष्ट्रातील 48 पैकी 26 ते 28 जागा महाविकास आघाडीला मिळतील, असे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. भाजपप्रणीत महायुतीला 20 जागांचा अंदाज या सर्व्हेतून पुढे आला आहे.