सांगली : पुढारी वृत्तसेवा
बेकायदेशीर संपात सहभागी होवून प्रवाशांची गैरसोय करून संप रखडविल्याने जिल्ह्यातील 58 एस.टी.कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सांगली विभाग नियंत्रक सुनिल भोकरे यांनी ही कारवाई केली. निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये इस्लामपूर आगारातील 20, आटपाडी 20, जत 16 आणि पलुस आगारातील 2 अशा एकूण 58 चालक, वाहक व अन्य कर्मचार्यांचा समावेश आहे.
विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यासह जिल्ह्यातील दहा आगारातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. एस.टी.च्या संपामुळे सोमवारी 1547 तर मंगळवारी 1560 एस.टी.फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एस.टी.ला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.
विविध मागण्यांसाठी कर्मचारी कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आला होता. परंतु त्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर कृती समितीने संप मागे घेतला होता. त्यानंतर विलिनीकरणासाठी कर्मचार्यांनी संघटना विरहीत संप पुकारला आहे. ऐन दिवाळीत कर्मचार्यांनी संप केल्याने जिल्ह्यातील एस.टी. वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे.
विलिनीकरणाची मागणी ही महामंडळाच्या अखत्यारीत नसून शासनाच्या आधिन आहे. त्यामुळे कर्मचार्यांनी बेकायदेशीर संपात सहभागी न होता सेवेत रुजू व्हावे, असे महामंडळाकडून कर्मचार्यांना सांगण्यात आले होते. परंतु महामंडळाच्या नोटिसीकडे दुर्लक्ष करीत सुरुवातीला आटपाडी त्यानंतर टप्प्याटप्प्याने विटा, जत, शिराळा आणि इस्लामपूर आगारातील कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यानंतर इतर आगारांनी देखील सहभाग घेतला होता.
वारंवार सूचना करून देखील सेवेत रुजू न झाल्याने तसेच बेकायदेशीर संपात सहभागी होवून प्रवाशांची गैरसोय करणे, न्यायालयाने बेकायदेशी संप असल्याचे सांगून देखील संपात सहभागी होवून न्यायालयाचा अवमान करणे इत्यादी कारणास्तव या कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले आहे. असल्याचे विभाग नियंत्रक भोकरे यांनी सांगितले.