Latest

उत्तराखंड : जलप्रलयात 55 मृत्युमुखी

Arun Patil

सिमला, वृत्तसंस्था : गेल्या 24 तासांत भूस्खलन, ढगफुटी आणि पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये हिमाचल प्रदेेशात 52 जण मरण पावले आहेत; तर उत्तराखंडात तीन मरण पावले. दोन दिवसांपासून या राज्यांत सतत व मुसळधार सुरू असून, हवामान खात्याने 16 ऑगस्टपर्यंत राज्यात अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.

डोंगरावरून रस्त्यांवर अजूनही दगड कोसळत आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. सिमला येथील बालूगंज येथील शिव बावडी मंदिरावर भूस्खलनाने प्रचंड ढिगारा कोसळला असून त्यात 11 जण मरण पावले आहेत. दोन मुलांचा त्यात समावेश आहे. सोलनमध्ये अशाच घटनेत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

एसडीआरएफ, आयटीबीपी, पोलिस आणि स्थानिक लोक शिवबावडी मंदिराच्या बचावकार्यात व्यग्र आहेत. जेसीबी मशिनने ढिगारा काढला जात आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह घटनास्थळी उपस्थित आहेत. 10 ते 15 लोक अजूनही ढिगार्‍यांखाली अडकलेले असण्याची भीती आहे.

स्थानिक रहिवासी किशोर ठाकूर यांनी सांगितले की, आज श्रावणाचा शेवटचा सोमवार असल्याने त्यांचे 4 पुतणे मंदिरात खीर बनवण्यासाठी गेले होते. ते अद्याप अडकलेले आहेत.

भूस्खलन झाले त्यावेळी मंदिरात दोन सुतार, एक नेपाळी आणि काही स्थानिक लोक हजर होते. अन्य स्थानिकांनी नेपाळी व्यक्तीला बाहेर काढले.

चारधाम यात्रा दोन दिवस स्थगित

उत्तराखंडातील डेहराडूनमधील डिफेन्स कॉलेजची संपूर्ण इमारत ढासळली आहे. बहुतांश नद्यांना पूर आला आहे. गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंदाकिनीला आलेल्या पुरामुळे रुद्रप्रयाग-गौरीकुंड महामार्ग बंद झाला आहे. शेकडो यात्रेकरू अडकून पडले आहेत. रुद्रप्रयाग येथे एक, तर ऋषीकेश येथे दोन जण सोमवारी मरण पावले. मोहन चट्टी क्षेत्रात हरियाणातील एक 5 जणांचे कुटुंब भूस्खलनाच्या ढिगार्‍यात दबले आहे. पौडी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेकजण मरण पावले आहेत.

सोमवारी सकाळी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली. बचाव कार्याचा आढावा त्यांनी घेतला. मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णयही यावेळी झाला. प्रशासन, पोलिस, बचाव दलाला 24 तास सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले.

हजारो अडकलेले

चारधाम यात्रेसाठी देशभरातून गेलेले अनेक लोक भूस्खलन, पूर आदी कारणांमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेले आहेत.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून सहवेदना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केली आहे.

SCROLL FOR NEXT