Latest

धक्कादायक ! ‘आनंदाच्या शिधा’मध्ये 50 लाखांचा घोटाळा

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सव, दिवाळीसह विविध सणवार गरीब कुटुंबांनाही आनंदात साजरे करता यावेत, यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या 'आनंदाचा शिधा' योजनेत पाथर्डी तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले आहे. रेशन दुकानदारांना पुरवठा शाखेकडून चार महिन्यांपासून 'आनंदाचा शिधा' वितरित करण्यात आला. 'त्याचे पैसे आम्ही पुरवठा शाखेतील अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार या विभागात काम करणार्‍या एका तरुणाकडे दिले; परंतु ती रक्कम त्या तरुणाने कोषागारात भरलीच नाही,' असा आरोप करत रेशन दुकानदारांनी ही रक्कम भरण्यास नकार दिल्यानंतर हा गैरव्यवहार समोर आला आहे. दुसरीकडे 'ही रक्कम जमा करा,' असे आदेश महसूल प्रशासनाने दिल्याने 'पुढे काय,' असा प्रश्न रेशन दुकानदारांपुढे उभा राहिला आहे.

दिवाळी, गुढीपाडवा व गणेशोत्सव या काळात तालुक्यात एकूण 164 रेशन दुकानदारांना पुरवठा शाखेने 'आनंदाचा शिधा' दिला. तीन टप्प्यांमध्ये दिलेल्या या शिध्याची रक्कम जवळपास 50 लाख रुपयांच्या आसपास असून हा शिधा विकल्यानंतर त्याची रक्कम रेशन दुकानदारांनी शासकीय कोषागारात भरणे बंधनकारक आहे. मात्र रेशन दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, पुरवठा शाखेतील एका अधिकार्‍याने तोंडी आदेश दिले होते, की ही रक्कम पुरवठा शाखेत गेल्या सात ते आठ वर्षांपासून 'कार्यरत' असलेल्या एका खासगी तरुणाकडे जमा करावी. त्यामुळे आम्ही शिधाविक्रीतून आलेली रक्कम या तरुणाकडे जमा केली. आता आम्ही पुन्हा पैसे भरणार नाही, असा पवित्रा या दुकानदारांनी घेतला आहे. दुसरीकडे महसूल प्रशासनाने रेशन दुकानदारांनी ही रक्कम तातडीने शासनाच्या खात्यात भरावी, असे तोंडी आदेश दिले आहेत.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या विषयावर पुरवठा शाखेत उलटसुलट चर्चा सुरू आहे. आज याच विषयावर सर्व रेशन दुकानदारांनी बैठक घेत 'आम्ही आमचे पैसे जमा केल्याने पुन्हा पैसे भरणार नाही,' असा पवित्रा घेतला, तर दोन दिवसांपूर्वी तहसीलदार श्याम वाडकर यांनी रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करत, ज्यांच्याकडे बाकी आहे, त्यांनी ती जमा करावी, असे आदेश दिले आहेत.
हा शिधा दुकानदारांना तीन टप्प्यात देण्यात आला असून पहिल्या टप्प्यात दिलेल्या मालाचे पैसे पूर्ण जमा झाले की नाही, हे न पाहताच पुरवठा शाखेने दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यात माल दुकानदारांना कसा दिला, हे समजू शकले नाही. दुसरीकडे रेशन दुकानदारांनी विकलेल्या मालाचे पैसे कोषागारात भरणे बंधनकारक असताना खासगी तरुणाकडे का जमा केले, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. रेशन दुकानदारांनी ही रक्कम भरली नाही, तर महसूल प्रशासन त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
यासंदर्भात पुरवठा अधिकारी ज्योती अकोलकर व या विभागाशी संबंधित अधिकारी संदीप बडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पुरवठा शाखेत कोणीही खासगी व्यक्ती काम करत नाही. रेशन दुकानदारांनी वास्तविक त्या रकमेचे चलन भरून पावती ताब्यात घ्यायला हवी. परस्पर कोणाकडे पैसे देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ज्यांच्याकडे बाकी आहे त्यांच्याशी चर्चा केली असून, 15 दिवसांत पैसे भरण्याचे ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यांची कोणी फसवणूक केल्यास त्यांनी संबंधितांवर पोलिसात गुन्हा दाखल करावा.
                                                            – श्याम वाडकर, तहसीलदार

'पुरवठा शाखेत आठ वर्षांपासून काम करणार्‍या तरुणाकडे पैसे द्या' असे पुरवठा शाखेतील अधिकार्‍यांनी सांगितल्याने आम्ही त्याच्याकडे पैसे दिले. मी स्वतः 'ऑनलाईन' दीड लाख रुपये दिले असून, त्याने पैसे भरले नसतील तर आमचा काय दोष? हा मोठा घोटाळा असून वेळ पडल्यास फिर्याद देऊ.
                                          – रवींद्र ऊर्फ पिनू मुळे, रेशन दुकानदार, शिराळ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT