Latest

शेअर मार्केट फ्रॉड जोमात: उच्चभ्रू जाळ्यात; चार महिन्यांत तब्बल 50 कोटींचा गंडा

अनुराधा कोरवी

मुंबई/ पुणे : अशोक मोराळे :  शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जर तुम्हाला कोणी शंभर ते दोनशे टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत असेल तर जरा थांबा. कारण 776 पुणेकरांना सायबर ठगांनी चार महिन्यांत शेअर मार्केट फ्रॉडद्वारे तब्बल 50 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा गंडा घातला आहे. या फसवणुकीमुळे सीए (लेखाधिकारी), आयटी अभियंता यांसारखे उच्चशिक्षित या ठगांच्या जाळ्यात अडकले आहेत. व्यावसायिक अन् शेअर ब्रोकरचा सुद्धा यात समावेश आहे. यंदाच्या तक्रारींची संख्या विचारात घेतली, तर तब्बल 27 पटींनी या गुन्ह्यात वाढ झाल्याचे निदर्शनास येते.

चार महिन्यांत (जानेवारी ते एप्रिल) शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात 1135 नागरिकांनी सायबर चोरट्यांकडून झालेल्या फसवणुकीबद्दल तक्रारी केल्या. त्यामध्ये 776 शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने फसवणूक झालेल्या तक्रारींचा समावेश आहे. मागील वर्षी शेअर मार्केट फ्रॉडच्या केवळ 28 तक्रारी दाखल होत्या. त्यामुळे तब्बल 27 पटींनी या गुन्ह्यात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या फसवणुकीच्या गुन्ह्यांची व्याप्ती किती मोठी आहे, हे दिसून येते. स्थानिक पोलिस ठाण्यांकडे दाखल होणार्‍या तक्रारींची संख्या वेगळीच आहे.

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक केली जातेय. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अशा तक्रारींत मोठी वाढ झाली आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्याकडे 776 तक्रारी दाखल असून त्यामध्ये 105 गुन्हे दाखल झाले आहे. फसवणुकीचा आकडा 50 कोटींपेक्षा अधिक आहे. प्रलोभन आणि भीती दाखवून सायबर ठगांकडून ही आर्थिक फसवणूक केली जात आहे.
-मीनल सुपे-पाटील, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT