Latest

हवाहवाई ! पुणे विमानतळावरून एप्रिलमध्ये 5 हजार 47 उड्डाणे

अमृता चौगुले

प्रसाद जगताप

पुणे : उन्हाळी सुट्यांमुळे गेल्या एप्रिल महिन्यात एसटी, रेल्वे व खासगी बसला झालेली तुफान गर्दी आपण पाहिलीय. याच महिन्यात विमानांनासुध्दा प्रचंड गर्दी झाली होती. एकाच महिन्यात पुणे विमान तळावरून तब्बल 7 लाख 66 हजार 402 प्रवाशांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे. तर या प्रवाशांकरिता पुणे विमानतळावरून विमानांची 5 हजार 47 उड्डाणे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे शहर हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेले मोठे शहर आहे.

त्यातच आता पुणे शहर आयटी आणि औद्योगिक क्षेत्रातही आघाडीवर आहे. त्याचाच परिणाम यंदा उन्हाळ्याच्या मिळालेल्या सुट्यांमुळे पुणेकरांनी पुणे शहरात पर्यटन करण्यावर मोठा भर दिल्याचे पहायला मिळत आहे. त्यासोबतच पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनाकरिता पुण्याच्या बाहेरदेखील गेले आहेत. त्यामुळे मागील एप्रिल 2023 या महिन्यात पुणे विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळत होती. त्यामुळे विमानेही हाऊसफुल्ल होती. एप्रिल महिन्यात झालेल्या या उड्डाणांची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया, एएआय) नुकतीच दिली.

अचानक सेवा बंद झाल्याने प्रवाशांना त्रास

काही दिवसांपूर्वी अचानकच गो फर्स्ट या विमान सेवेने आपली सेवा बंद केली. त्यामुळे पुणे विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांना विमान उड्डाणाकरिता तब्बल 9 ते 11 तास वाट पहावी लागली. तर अनेक उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आता ही परिस्थिती हळूहळू सुधारत आहे.

गो फर्स्टची विमान सेवा 23 तारखेपर्यंत बंद

गो फर्स्ट या विमान कंपनीने मागील काही दिवसांपूर्वी अचानक आपली विमानसेवा 9 मेपर्यंत बंद करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे देशातील सर्वच विमानतळांवर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मात्र, आता या कंपनीने पुन्हा आपली सेवा 23 मेपर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासोबतच कंपनीने प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत, आम्ही लवकरच प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे परत करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, विमान कंपनीने आम्ही आमची सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असून, लवकरच आपल्या सेवेसाठी उभे राहू, असेदेखील या वेळी कंपनीकडून सांगण्यात आले.

पुणे विमानतळावरील सरासरी रोजची उड्डाणे
आगमन : 77 ते 80 दरम्यान
निर्गमन : 77 ते 80 दरम्यान
एकूण उड्डाणे : 160 ते 170

पुणे विमानतळावरील सरासरी रोजचे प्रवासी
आगमन – 12,000
निर्गमन – 12,000

SCROLL FOR NEXT