Latest

Italy | मोठी दुर्घटना! दक्षिण इटलीच्या समुद्रात बोट बुडून ४३ जणांचा मृत्यू, ८० जण वाचले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण इटलीच्या (southern Italy) समुद्रात एक बोट बुडाल्याने एका बाळासह ४३ स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे. तर ८० लोक यात दुर्घटनेतून वाचले आहेत. ही बोट ओव्हरलोड होती. त्यात समुद्र खवळलेला होता. यामुळे दुर्घटना घडल्याचे समजते. कॅलाब्रिया प्रदेशातील क्रोटोन शहराला लागून असलेल्या किनाऱ्यावर बोटीतील १०० हून अधिक लोक उतरण्याच्या प्रयत्नात होते. यादरम्यान ही बोट तुटली. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. येथून जवळच असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक मृतदेह सापडले आहेत.

नागरी संघर्ष आणि गरिबीला कंटाळून मोठ्या संख्येने लोक दरवर्षी आफ्रिकेतून इटलीत स्थलांतर करतात. ही बोट नेमकी कुठून आली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण स्थानिक वृत्तसंस्थांनी असे सांगितले आहे की या बोटीतील लोक इराण, इराक, सीरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि सोमालिया येथील होते. खराब हवामान आणि समुद्र खवळलेला असताना ही बोट खडकाला धडकली, असे Adnkronos या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या दुर्घटनेनंतर इटालियन अधिकाऱ्यांनी समुद्रात शोध आणि बचाव मोहीम राबवली.

तटरक्षक दलाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, "सध्या ८० लोकांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. तर काही जण बुडल्यानंतर पोहत किनाऱ्यावर पोहोचले." किनारपट्टीवर ४३ मृतदेह सापडले आहेत," असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

इटलीच्या (Italy) पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी या दुर्घटनेला मानवी तस्करांना जबाबदार धरले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT