पुणे; पुढारी वृत्तसेवा : विवाहबंधनात अडकण्याआधी पारंपरिक पद्धतीने मुहूर्त पाहण्या बरोबरच व्हॅलेंटाइन डे, नाताळ आणि विशेष दिवस, असे खास दिवस निवडले जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही 14 फेब्रुवारी या प्रेम दिनाचे औचित्य साधत पुण्यातील 40 प्रेमीयुगुल नोंदणी पद्धतीने विवाह करीत सहजीवनाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. विवाह नोंदणी कार्यालयात पूर्वनोंदणी केली आहे.
पत्रिका आणि मुहूर्त पाहून विवाह करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याबरोबरच नोंदणी पद्धतीने विवाह (रजिस्टर्ड मॅरेज) करणार्यांचीही संख्या वाढत आहे. विवाहासाठी सुमारे एक-दीड महिन्यापूर्वीच शहर विवाह नोंदणी कार्यालयात पूर्वनोंदणी करण्यात आली आहे. या दिवशी शासकीय मुद्रणालय (फोटोझिंको) येथील विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी मोठी गर्दी होते.
विवाहाचे प्रमाणपत्र जागेवरच
मुंबई, मुंबई उपनगर आणि पुणे अशा तीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विवाह नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. विवाह नोंदणी अधिकार्यांकडे नोटीस आणि त्यासाठी आवश्यक पुराव्यांची कागदपत्रे जमा केल्यानंतर 30 दिवसांच्या आत कोणत्याही प्रकारचा आक्षेप न आल्यास वधू आणि वर तीन साक्षीदारांसमक्ष अधिकार्यांसमोर विवाह करू शकतात. विवाहाचे प्रमाणपत्रही लगेच देण्याची व्यवस्था दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली आहे.