नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- देशात ३९ जलविद्युत प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असून विविध कारणांमुळे ९ प्रकल्पांचे काम ठप्प आहे, अशी माहिती केंद्रीय उर्जा मंत्री आर. के. सिंग यांनी आज ( दि. २) लोकसभेत लेखी उत्तरादाखल दिली. ठप्प असलेले प्रकल्प पुन्हा सुरु व्हावेत, याकरिता सरकारी पातळीवर तसेच विकासकांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सध्या ३९ जलविद्युत प्रकल्पांवर काम सुरु आहे, त्यांची एकति्रत क्षमता 14 हजार 623.5 मेगावॅट इतकी आहे. यातील 13 हजार 387.5 मेगावॅट क्षमतेच्या 30 प्रकल्पांचे काम वेगाने सुरु असून, हे प्रकल्प वर्ष 2026-27 मध्ये कार्यान्वित होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे 1236 मेगावॅट क्षमतेच्या 9 प्रकल्पांचे काम विविध कारणांमुळे ठप्प पडलेले आहे. ईशान्य भारतात जे जलविद्युत प्रकल्प स्थापन केले जात आहेत, ते प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या माध्यमातून केले जात आहेत, अशी माहिती सिंग यांनी दिली.
31 डिसेंबर 2022 रोजीच्या आकडेवारीनुसार, देशात २११ जलविद्युत प्रकल्प कार्यरत असून त्यांची एकत्रित क्षमता 46 हजार 850.15 मेगावॅट इतकी आहे. हिमालय पर्वत क्षेत्रात 30 जलविद्युत प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले होते. यांची एकत्रित वीजनिर्मिती क्षमता 11 हजार 137.50 मेगावॅट इतकी आहे. पैकी 10 हजार 381.5 मेगावॅट क्षमतेच्या 23 प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असून, उर्वरित 756 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे काम विविध कारणांमुळे थांबलेले आहे, असेही सिंग यांनी सांगितले.
हेही वाचा :