Latest

किल्ले प्रतापगडावर 364 मशालींचा लखलखाट

Arun Patil

प्रतापगड, पुढारी वृत्तसेवा : किल्ले प्रतापगडावरील आई भवानी माता मंदिराच्या स्थापनेला यावर्षी 364 वर्षे पूर्ण झाल्याने प्रतापगडावरील स्थानिक नागरिकांनी येथे आलेल्या हजारो शिवभक्तांच्या साक्षीने रात्री 364 मशाली प्रज्वलित केल्या. त्यामुळे अवघा प्रतापगड सोनेरी प्रकाशाने उजळून निघाला. फटाक्यांची आतषबाजी आणि शिवभक्तांच्या जयघोषाने प्रतापगड दुमदुमून गेला.

किल्ले प्रतापगड हा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने ओळखला जातो. तो साक्षात आई भवानीच्या प्रतिष्ठापनेनेही पावन झालेला हिंदवी स्वराज्यातील एक महत्त्वपूर्ण गड आहे.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्यावर चालून आलेल्या उन्मत अफजलखानाचा येथेच कोथळा काढला होता. या घटनेने हिंदुस्थानच्या इतिहासाला एक नवी कलाटणी मिळाली होती. हा भीम पराक्रम जिच्या आशीर्वादाने प्रत्यक्षात आला. तिचे स्मरण म्हणून छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर आई भवानीचे मंदिर बांधून तेथे आदिशक्तीची स्थापना केली.

प्रतापगडनिवासीनी आई जगदंबेच्या स्थापनेला 2010 साली 350 वर्षे पूर्ण झाली होती. या घटनेचे औचित्य साधून प्रतापगडावरील स्थानिक
भुमिपुत्र चंद्रकांत उतेकर यांच्या कल्पनेतून प्रतापगडावर प्रथम 2010 साली 350 मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव साजरा केला गेला. यावर्षी या महोत्सवाला 14 वर्षे पूर्ण झाली. शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर 2023 ला भवानी माता मंदिर स्थापनेला तब्बल 364 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने 364 मशाली प्रज्वलीत करण्यात आल्या. यामुळे अवघा प्रतापगडचा आसमंत सोनेरी प्रकाशाने उजळून निघाला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT