Latest

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाणी टंचाई

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे विभागातील सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या एकही टँकर सुरू झालेला नाही. मात्र, सातारा जिल्ह्यात बारा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून, विभागात सर्वाधिक 33 टँकर हे पुणे जिल्ह्यात सुरू करावे लागले आहेत. विशेष म्हणजे यातील तीन टँकर हे शासकीय असून, उर्वरित 30 टँकर हे खासगी असल्याची माहिती समोर आली.

गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे सध्या अनेक धरणांत पुरेसा पाणीसाठा असून, त्यामुळे तुलनेत पाणी टंचाई जाणवत नाही. तरीही पुणे विभागातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तर उर्वरित कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात सध्या एकही टँकर सुरू नाही. पुणे जिल्ह्यातील 33 टँकरद्वारे 42 गावे आणि 192 वाड्यांतील 66 हजार 609 नागरिकांना पाणी पुरविले जात आहे. त्यामध्ये आंबेगाव तालुक्यात 12, जुन्नर आणि खेड तालुक्यातील प्रत्येकी नऊ टँकर सुरू आहेत. पाणी पुरवठ्यासाठी 27 विहीर आणि बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात 12 टँकरद्वारे 13 गावे आणि 43 वाड्यातील सुमारे 16 हजार नागरिकांना पाणी पुरविले जात आहे. विशेष म्हणजे साडेतीन हजार जनावरांनाही पाणी टंचाईचा फटका सहन करवा लागत आहे. सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या 12 टँकरपैकी 9 टँकर हे शासकीय तर तीन टँकर खासगी आहेत. याउलट पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या 33 टँकरपैकी केवळ तीन टँकर हे शासकीय आहेत. तर उर्वरित 30 टँकर हे खासगी आहेत.

SCROLL FOR NEXT