Latest

Lok Sabha Election 2024 : लोकशाहीच्या रथावर घराणेशाहीच आरूढ! राज्याच्या राजकारणावर तीस घराण्यांचा प्रभाव

दिनेश चोरगे

राज्यातील राजकारणाचा मागील पन्नास-साठ वर्षांचा आढावा घेता हे स्पष्टपणे जाणवते की, जवळपास तीस घराण्यांनी इथल्या राजकारणावर वर्षानुवर्षे मांड ठोकलेली आहे. फिरून फिरून त्याच त्याच घराण्यातील पुढच्या पिढ्या आज राजकारणात सक्रिय झालेल्या दिसत आहेत.

घराणेशाहीची सुरुवात!

राज्याच्या राजकारणातील घराणेशाहीची सुरुवात करण्याचा मान विखे-पाटील घराण्याकडे जातो. सुरुवातीला विठ्ठलराव विखे-पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात आपले नेतृत्व प्रस्थापित केले. त्यानंतर 1970 च्या दशकात राजकारणात उतरून त्यांचे चिरंजीव बाळासाहेब विखे-पाटील यांनी राजकारणातील घराणेशाहीची रीतसर पायाभरणीच केली, असे म्हणावे लागेल. सध्या या घराण्यातील राधाकृष्ण विखे-पाटील ही परंपरा पुढे चालवत आहेत. या घराण्यातील चौथी पिढीसुद्धा सुजय विखे-पाटील यांच्या रूपाने सक्रिय आहे.

राजकारण व्हाया सहकार!

राज्याच्या राजकारणावर 1960 च्या दशकापासून सहकाराचा प्रभाव पडण्यास सुरुवात झाली. सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, दूध संघ, बँका, त्याच्या बरोबरीने शाळा-महाविद्यालये उभा करणारे नवनेतृत्व या काळात उभे राहात गेले आणि हळूहळू हेच नेतृत्व राजकारणातही प्रभावी होत गेलेले दिसते. वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते-पाटील, शरद पवार, राजारामबापू पाटील, शंकरराव चव्हाण, पतंगराव कदम, विलासराव देशमुख, बाळासाहेब थोरात, यशवंतराव गडाख, बाळासाहेब माने, सदाशिवराव मंडलिक अशी घराणी सहकार आणि अन्य संस्थात्मक उभारणीच्या माध्यमातून राजकारणातही प्रभावी होत गेलेली दिसतात. या घराण्यांच्या दुसर्‍या-तिसर्‍या आणि चौथ्या पिढ्याही राजकारणात सक्रिय होताना दिसतायत. स्वातंत्र्योत्तर कालखंडात राजकारणावर काँग्रेसचा प्रभाव होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये घराणेशाही मोठ्या प्रमाणात दिसते.

प्रभावशाली दादा घराणे!

राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली घराणे म्हणून दादा घराण्याचा उल्लेख करावा लागेल. वसंतदादा पाटील यांचा संपूर्ण राज्याच्या राजकारणावर प्रभाव होता. राज्यात दादा गट म्हणून राज्यकर्त्यांची एक फळीच कार्यरत होती. स्वत: दादा यांनी चारवेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले होते. त्यांचे पुत्र प्रकाशबापू पाटील हे पाचवेळा खासदार म्हणून विजयी झाले होते. पुतणे विष्णूअण्णा पाटील हे प्रदीर्घकाळ आमदार होते. विष्णूअण्णांचे चिरंजीव मदन पाटील हे दोनवेळा खासदार आणि दोनवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. शिवाय मंत्री म्हणूनही त्यांचा समावेश झाला होता. प्रकाशबापू पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. इतकी या घराण्याची प्रदीर्घ परंपरा आहे.

पवारांची घराणेशाही!

वसंतदादा पाटील यांच्यानंतर राज्याच्या राजकारणावर शरद पवार यांनी मांड ठोकली. मागील जवळपास 57 वर्षांपासून ते आजतागायत शरद पवार हे राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी दिसतात. स्वत: पवार हे चारवेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण आणि कृषिमंत्री होते. त्यांच्या कन्या सुप्रिया या दोनवेळा बारामतीच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. पुतणे अजित पवार यांनीही चारवेळा राज्याचे उपमुख्यमंत्रिपद भूषविले आहे. सध्या काका-पुतण्याच्या वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी राज्याच्या राजकारणावर या घराण्याचा प्रभाव मात्र कायम आहे.

मोहिते-पाटलांची परंपरा!

एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर शंकरराव मोहिते-पाटील यांचे वर्चस्व होते. कालांतराने विजयसिंह मोहिते-पाटील यांनी या भागाच्या राजकारणावर मांड ठोकून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. आज मोहिते-पाटील भाजपमध्ये असून त्यांचे पुतणे धैर्यशील हे आपल्या घराण्याची परंपरा पुढे चालविण्यास सज्ज झालेले दिसतायत.

राजारामबापू पाटील!

राजारामबापू पाटील यांचाही एकेकाळी राज्याच्या राजकारणावर प्रभाव होता. त्यांनी अनेक वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले होते. कालांतराने ही धुरा जयंत पाटील यांनी खांद्यावर घेतली. 1990 पासून ते आजपर्यंत सलग सातवेळा त्यांनी इस्लामपूरमधून विजय मिळविला आहे. प्रदीर्घकाळ राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केले आहे. आजकाल त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे राजकारणात एंट्री करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.

चव्हाण-देशमुख-कदम घराणे!

शंकराराव चव्हाण यांनीही मुख्यमंत्रिपदासह केंद्रीय मंत्री म्हणून काम केले होते. त्यांचे चिरंजीव अशोक चव्हाण हेही राज्याचे मुख्यमंत्री होते. सध्या ते भाजपमध्ये असून राज्यसभेचे खासदार आहेत. विलासराव देशमुख हेही राज्याचे प्रदीर्घकाळ मंत्री-मुख्यमंत्री होते. आज त्यांचे चिरंजीव अमित हा वारसा पुढे चालवत आहेत. पतंगराव कदम यांनीही प्रदीर्घकाळ मंत्री म्हणून काम केलेले होते. आज विश्वजित कदम हे दुसर्‍यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

काँग्रेसेतर घराणी!

साधारणत: 1970 च्या दशकात राज्यात काँग्रेसविरोधी राजकारण प्रभावी होत गेले. या काँग्रेसविरोधी लाटेतून राज्याच्या राजकारणात काही नवीन घराणी उदयाला येत गेली. त्यापैकी सर्वात प्रभावशाली घराणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे घराणे. बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या रूपाने दुसरी आणि आदित्य ठाकरेंच्या रूपाने तिसरी पिढी आज सक्रिय आहे. शिवाय राज ठाकरे यांच्या रूपाने आणखी एक स्वतंत्र शाखाही सुरू झालेली आहे. शिवसेनेतूनच छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे या राजकीय घराण्यांचा उदय होत गेला.

नवीन घराणी!

राज्याच्या राजकारणात जसजसा काँग्रेसविरोधी विचारधारेचा प्रभाव वाढत गेला, तसतशी आणखी नवीन घराणी राज्याच्या राजकारणात प्रस्थापित होत गेली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, सुरेश जैन, उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, महादेवराव महाडिक अशी काही घराणी प्रस्थापित होत गेली. रायगडमधील शेकापचे दत्ता पाटील यांच्या घराण्यातील तिसरी पिढी आज राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेली दिसते.

घराणेशाही कायम!

घराणेशाहीतून राजकारणाच्या प्रवाहात आलेले त्या त्या घराण्यांचे वरसदार आजही त्याच राजकीय पक्षात राहिलेले आहेत, असेही नाही. अनेक वारसदारांनी आपापल्या राजकीय सोयीनुसार वेगवेगळ्या पक्षांशी घरोबा केलेला दिसतो. राधाकृष्ण विखे-पाटील, राज ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, गणेश नाईक आदींनी याबाबतीत वेगळा पायंडा पाडलेला दिसतो. कोण कोणत्या पक्षात आहे, याला आजकाल फारसे महत्त्व राहिलेले नाही; पण राजकारणातील घराणेशाही मात्र टिकून आहे.

काही घराणी मात्र राजकारणातून दूर!

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा कोणी वारसदार नसल्यामुळे त्यांचा वारसा खंडित झाला. जवळपास अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविणार्‍या वसंतराव नाईक यांचे पुतणे सुधारकराव नाईक यांनीही राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले. पण आजकाल नाईक घराण्याचा प्रभाव दिसत नाही. भाऊसाहेब हिरे यांचे वारसदारही फारसे प्रभावी नाहीत. राजकारणातून नामशेष झालेली घराणी एका हाताच्या बोटावर मोजता येतील.

SCROLL FOR NEXT