Latest

30 Days With Shami : बलात्कार, पाकबरोबर फिक्सिंगचा आरोप ते आत्महत्येचा प्रयत्न! ‘या’ पुस्तकातून उलगडणार शमीचा प्रवास

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : 30 Days With Shami : शमी…शमी…शमी… न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलनंतर सर्वत्र एकाच नावाचा जयघोष होत आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे जन्मलेल्या या भारतीय गोलंदाच्या यशाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. पण त्याने हे स्थान कोणत्या संघर्षातून मिळवले, याबाबत लवकरच सविस्तर वाचायला मिळणार आहे. उत्तराखंडमधील खानपूरचे अपक्ष आमदार उमेश कुमार आता शमीचा प्रवास शब्दांत गुंफणार आहेत. या पुस्तकाचे नाव असेल- '30 डेज विथ शमी'. शमीच्या आयुष्यातील सर्वात संघर्षमय ठरलेल्या 'त्या' एक महिन्यावर हे पुस्तक असणार आहे, असा खुलासा कुमार यांनी केला आहे.

विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय मिळवला आणि फायनलमध्ये दिमाखात धडक मारली. भारताच्या विजयानंतर प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव आहे ते म्हणजे मोहम्मद शमी. न्यूझीलंडविरुद्ध त्याने तब्बल 7 विकेट घेतल्या. यासह त्याने यंदाच्या स्पर्धेत तब्बल तिसऱ्यांदा पाच विकेट घेण्याची किमया केली. वर्ल्डकपच्या अवघ्या 6 सामन्यांत 23 विकेट घेऊन शमीने खळबळ उडवून दिली आहे. यासह तो सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहचला आहे. एक भारतीय गोलंदाज म्हणून विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासत त्याच्या नावावर सर्वाधिक बळींची नोंद झाली आहे. शमीने आतापर्यंत खेळलेल्या विश्वचषक स्पर्धेतील 17 सामन्यात 54 विकेट घेतल्या आहेत. (30 Days With Shami)

शमीला कोणत्या परिस्थितीतून जावे लागले, त्यांचा संघर्ष कसा होता? हे आता आपल्याला '30 डेज विथ शमी' या पुस्तकातून उलगडणार आहे. उमेश कुमार यांनी शमी सोबतचा फोटो शेअर करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात की, 'हा तोच मुलगा आहे ज्याच्या विरोधात त्याच्या पत्नीने बलात्कार आणि हुंडा मागितल्याचा गंभीर आरोप केला. पाकिस्तानविरुद्ध फिक्सिंगचे पैसे घेतल्याचा आरोप करत त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली. इतकेच नाही तर शमीची आई, भाऊ, बहिण यांनाही तुरुगांत पाठवण्याचा कट रचण्यात आला. त्यानंतर त्याने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. तो एक महिना ज्याचा प्रत्येक दिवस शमीसाठी जीवन-मरणाचा प्रश्न होता. तो एक महिना ज्यात शमीने आपल्या घरातल्या 19 व्या मजल्यावरुन उडी मारण्याचा मनात विचार आणला. हा संपूर्ण संघर्ष '30 डेज विथ शमी' या पुस्तकात असणार आहे,' अशी भावना कुमार व्यक्त केली आहे. (30 Days With Shami)

न्यूझीलंडचे कंबरडे मोडले

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी खेळल्या गेलेल्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने न्यूझीलंडला 398 धावांचे मोठे लक्ष्य दिले. कर्णधार रोहित शर्माने 29 चेंडूत 47 धावा करून उत्कृष्ट सुरुवात करून दिली. त्यानंतर शुभमन गिलने 80, विराट कोहलीने 117 आणि श्रेयसने 105 धावांची शानदार खेळी केली आणि धावांचा डोंगर रचला. केएल राहुलनेही शेवटच्या षटकांमध्ये 20 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले. त्यानंतर मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी करत 57 धावांत 7 विकेट्स घेऊन विजयावर शिक्कामोर्तब केला.

संधीची वाट पाहत होता शमी

सामनावीर म्हणून निवड झालेल्या मोहम्मद शमीने सांगितले की, 'मी संधीची वाट पाहत होतो. धर्मशाला येथे किवींविरुद्ध मी पुनरागमन केले. ही एक अद्भुत अनुभूती आहे. गेल्या दोन विश्वचषकांमध्ये आम्ही उपांत्य फेरीत हरलो. अशी संधी पुन्हा कधी मिळणार हे कोणालाच माहीत नव्हते. त्यामुळे ती मिळाल्यावर मी कोणतीही कसर सोडली नाही. मला ही संधी हातून जाऊ द्यायची नव्हती.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT