Latest

Naxal Attack Chhattisgarh : सुकमा-विजापूर सीमेवर नक्षलवाद्यांच्या गोळीबारात तीन जवान शहीद, 14 जखमी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Naxal Attack Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये CRPF कॅम्पवर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला असून यात 3 जवान शहीद तर 14 जवान जखमी झाले आहेत. ही घटना सुकमा-विजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील टेकलगुडेम गावात घडली. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याची माहिती मिळताच अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी पोहोचला असून आणि त्यांनी परिसराची नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. 2021 मध्ये याच ठिकाणी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 23 जवानांना प्राण गमवावे लागले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सुकमा पोलिस ठाण्याअंतर्गत जगरगुंडा परिसरात नक्षलवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी आणि या परिसरातील नागरिकांना मदत करण्यासाठी आज 30 जानेवारी रोजी सुरक्षा कॅम्प सुरू केला होता. कॅम्पनंतर सीआरपीएफचे जवान जोनागुडा-अलीगुडा परिसरात सर्च ऑपरेशन करत होते. या दरम्यान नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. उत्तरादाखल सुरक्षा जवानांनी गोळीबार केला. सीआरपीएफच्या जवानांनी आक्रमक उत्तर देण्यास सुरुवात केल्याने नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले आहेत तर 14 जण जखमी झालेत. जखमी जवानांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रायपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

गतवर्षी डिसेंबर महिन्यात छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधी नक्षलवादी हल्ला झाला होता. 13 डिसेंबर 2023 रोजी नक्षलवाद्यांनी नारायणपूर येथे आयईडी स्फोट घडवून आणला होता. यामध्ये एक जवान शहीद, तर एक जखमी झाला होता. राजधानीत विष्णुदेव साय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची तयारी करत असतानाच हा हल्ला झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT