Latest

IND vs SA 2nd Test : विजयी आघाडी की बरोबरी?

Arun Patil

जोहान्सबर्ग ; वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना (IND vs SA 2nd Test) सोमवारपासून सुरू होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाला दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. 'बॉक्सिंग डे' कसोटीमध्ये सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेला पराभूत करीत भारताने आघाडी घेतली आहे. तसेच, जोहान्सबर्ग येथे भारताचा रेकॉर्डदेखील चांगला आहे. याच खेळपट्टीवर भारताने 2018 मध्ये यजमान संघाला पराभूत केले होते. भारतीय संघ गेल्या वर्षांपासून विदेशी खेळपट्टीवर चमकदार कामगिरी करीत आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ अनेक दिग्गज खेळाडूंच्या जाण्याने बदलाचा सामना करत आहे आणि त्यामुळे भारताला कसोटी सामना (IND vs SA 2nd Test) जिंकण्याची चांगली संधी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सध्याच्या संघाला भारताला आव्हान देणे सोपे नाही; पण यजमानांकडे कॅगिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी यांच्या रूपाने चांगले जलदगती गोलंदाज आहेत. ते प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतात.

यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन-डी-कॉकने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला झटका बसला आहे आणि त्यामुळे संघाची फलंदाजी फळी आणखीन कमकुवत झाली आहे. 25 वर्षीय रेयान रिकलटन दुसर्‍या कसोटीत पदार्पण करणे जवळपास निश्‍चित आहे. त्याच्यासमोर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या गोलंदाजीचे आव्हान असेल. पायाचे स्नायू दुखावल्यामुळे पहिल्या कसोटीच्या बाहेर गेलेला डुआने ओलिव्हर व्हियान मुल्डरच्या जागी संघात खेळू शकतो.

कोहलीने गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ शतक झळकावलेले नाही. त्यामुळे त्याचा प्रयत्न आपली कामगिरी उंचावण्याचा असणार आहे. कोहली पहिल्या कसोटी सामन्याआधी आणि नंतर प्रसारमाध्यमासमोर आला नाही. त्यामुळे सध्या राहुल द्रविड हा प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.

पाच गोलंदाजांसह उतरण्याच्या भारताच्या भूमिकेमुळे अंतिम एकादशमध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे. भारताने धिम्या षटक गतीसाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत आपला एक गुण गमावला. तसेच, जलदगती गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर चार जलदगती गोलंदाजांसह रविचंद्रन अश्‍विनदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT