Latest

पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना मिळाले एफआरपीचे 2992 कोटी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील 17 पैकी 11 साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिलेली आहे. तर, साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 30 एप्रिलअखेर सुमारे 2 हजार 992 कोटी रुपये जमा केलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील 11 सहकार खासगी मिळून 17 साखर कारखान्यांकडून हंगाम 2022-23 मध्ये ऊस गाळप सुरू राहिले.

त्यामध्ये 6 सहकारी आणि 5 खासगी साखर कारखान्यांनी उसाच्या एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकर्‍यांना दिली आहे. त्यामध्ये भीमाशंकर, माळेगाव, विघ्नहर, भीमा पाटस (श्री साईप्रिया शुगर्स लि.), सोमेश्वर, श्री संत तुकाराम सहकारी या सहा सहकारी आणि व्यंकटेश कृपा, श्रीनाथ म्हस्कोबा, पराग अ‍ॅग्रो, दौंड शुगर आणि बारामती अ‍ॅग्रो या पाच खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

एकूण देय एफआरपी रकमेचा आकडा 2 हजार 996 कोटी 28 लाख 24 हजार रुपये होता. त्यापैकी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 2 हजार 992 कोटी 86 लाख रुपये म्हणजे देय रकमेच्या 99.89 टक्के रक्कम जमा केली आहे. काही साखर कारखान्यांनी देय एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकर्‍यांना दिलेली आहे. त्यामुळे एफआरपीचे अद्याप 3 कोटी 42 लाख रुपये देणे बाकी दिसत आहे. प्रत्यक्षात काही कारखान्यांनी एफआरपीच्या 43 टक्क्यांइतकीच रक्कम दिलेली असल्याचे पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या अहवालात नमूद केले आहे.

SCROLL FOR NEXT