पुणे; पुढारी वृत्तसेवा : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीच्या निकालात 14 विद्यार्थ्यांनी पीसीएममध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) 100 टक्के पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत, तर पीसीबीमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) 14 विद्यार्थ्यांनी 100 टक्के पर्सेंटाईल गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला आहे.
यात पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. एमएचटी सीईटी निकाल सोमवारी सकाळी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आला. राज्यात 197, तसेच राज्याबाहेरील 16 केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने 9 ते 20 मे या कालावधीत 24 सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली होती.
एका विद्यार्थ्याला 191 गुण मिळाले व त्याला 99.99 पर्सेंटाईल मिळाले. दुसर्या मुलाने दुसर्या दिवशी वेगळ्या सत्रात परीक्षा दिली त्याला 171 गुण मिळाले. पहिल्या विद्यार्थ्यापेक्षा 20 गुण त्याला कमी मिळाले, परंतु त्याला 99.95 पर्सेंटाईल मिळाले. त्याचे पर्सेंटाईल केवळ 0.4ने कमी झाले. 20 गुणांचा फरक असून, पर्सेंटाईलमध्ये मात्र फारसा फरक पडला नाही. याचा अर्थ, वेगवेगळ्या सत्रांची काठीण्यपातळी वेगवेगळी होती. अशा वेळी प्रत्येक सत्रात गुण आणि पर्सेंटाईल याचे नेमके काय समीकरण होते, हे जाहीर करणे गरजेचे आहे.
अनेक वेळा गुण जास्त व पर्सेंटाईल कमी, तसेच गुण कमी व पर्सेंटाईल जास्त असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे एमएचटी सीईटीची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी 90 ते 100 गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तरी किमान गुण आणि पर्सेंटाईल याचे समीकरण जाहीर करणे गरजेचे असल्याचे मत प्रवेश परीक्षा तज्ज्ञ दुर्गेश मंगेशकर यांनी व्यक्त केले.
शेजल रमेश राठी (पीसीबी 100), आर्य तुपे, (पीसीबी 100), मृण्मयी विद्याधर भालेराव (पीसीएम 100), अपूर्वा प्रकाश महाजन (पीसीएम 100), तनीष नीलेश चुडीवाल (पीसीएम 100), कृष्णा मनीष काबरा (पीसीएम 100), अबोली मालशिकरे (पीसीएम 100), अंकित कौशल केसरोड (पीसीएम 99.92)
हेही वाचा