Latest

नगर जिल्ह्यात पोलिसांनी रोखले २१७ बालविवाह!

Shambhuraj Pachindre

नगर : रोहिणी पवार

महिला आणि मुलींच्या कायदेशीर (Ahmednagar ) अडचणी सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या भरोसा सेलने गेल्या वर्षभरात २१७ बालविवाह रोखण्याची कामगिरी पार पाडली आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचापासून अनेक विवाहितांची सुटका करून त्यांना सावरण्याचे काम दिलासा सेलने केले आहे. ज्या वयात शिक्षण घ्यायचे, खेळायचे-बागडायचे त्या वयात संसार आणि मातृत्व लादण्याचा प्रकार अल्पवयीन मुलींबाबत टळल्याने पोलीस व सामाजिक संस्थांच्या कामांचे कौतुक होत आहे.

पुरोगामी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाण मोठे आहे. कोरोना काळात तर हे प्रमाण अधिकच वाढले होते. खेडोपाडी अनेक बालविवाह झाले असून, त्यातून अनेक मुलींच्या पदरात शिकण्या, खेळण्या-बागडण्याच्या वयात संसार व शारिरीक अत्याचार झाले. मात्र, जेथे माहिती मिळते, तेथे बालविवाह रोखून मुलगी आणि मुलाच्याही कुटुंबीयांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या भरोसा सेलने केला आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २१७ बालविवाह रोखण्यात जिल्हा भरोसा सेल, तसेच विविध सामाजिक संघटना व बाल विकास अधिकारी कार्यालयाला यश आले आहे. बालविवाह रोखण्यात राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नगर (Ahmednagar) जिल्हा अग्रेसर असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. बालविवाह रोखण्यासोबतच बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवर बाल संरक्षण समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत.

त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासोबतच बालकांवर होणारे अत्याचार थांबविण्याचे प्रयत्न केले जातात. तसेच हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम भरोसा सेलने केले आहे. बालविवाह लावणाऱ्या वर आणि वधूच्या माता-पित्यांसह मंडप उभारणारे, आचारी व विवाह पार पाडणाऱ्यांना दोन वर्षे सक्तमजुरी आणि एक लाखाच्या दंडाची तरतूद आहे. याची जाणीव संबंधितांना करून देत बालविवाह रोखले जात असल्याचे सांगण्यात आले.

18 वर्षाखालील मुलीशी विवाह केल्यास व तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्यास थेट बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची भूमिका मध्यंतरी पोलिसांनी घेतली होती. त्याचाही सकारात्मक परिणाम दिसून आला. तरीही खेडोपाडी कमी अधिक प्रमाणात बालविवाह होत असून, त्यासाठी सामाजिक संस्थांनी प्रबोधनाची चळवळ आणखी गतिमान करण्याची गरज असल्याचा सूर या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

पोलीस अधीक्षकांचे आवाहन

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी बालविवाह घडत असल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिसांना 112 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन केले आहे.

गाव पातळीवर ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांना बालविवाहांबाबत पहिल्यांदा माहिती मिळते. त्यांना अशी कुठलीही माहिती मिळाली, तर लगेच पोलिसांशी संपर्क साधावा. त्यामुळे बालविवाह रोखण्यात आम्हाला यश येईल.

पल्लवी देशमुख,
पोलीस निरीक्षक, भरोसा सेल

SCROLL FOR NEXT