Latest

२ हजार रुपयांच्या नोटा आजपासून बदलून मिळणार

मोहन कारंडे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशभर मंगळवारपासून दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेमधून बदलून घेता येणार आहेत. यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, नागरिकांमध्ये संभ्रम पसरू नये, यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने सूचना जारी केल्या आहेत.

शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करत असल्याचे जाहीर करीत नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली. या काळात लोकांना बँकेत जाऊन नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत. एसबीआयने स्पष्ट केले आहे की, 20 हजार रुपयांपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेताना ओळखपत्र दाखवण्याची सक्ती नाही तसेच कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. तसेच आपल्याच खात्यात दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नसली, तरी केवायसी आणि इतर नियम लागूच राहतील, असे एसबीआयने म्हटले आहे.

सध्या चलनात असलेल्या 2 हजारांच्या बहुतांश नोटा 30 सप्टेंबरपर्यंत आरबीआयकडे परत येतील. पुढील चार महिन्यांमध्ये कधीही या नोटा बदलून घेता येणार असल्याने नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी करू नये. नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली. बँकांकडे इतर मूल्यांच्या नोटांचा पुरेसा साठा आहे.
– शक्तिकांत दास, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर

SCROLL FOR NEXT