Latest

पुणे-मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी

दिनेश चोरगे

मिरज :  रेल्वे अंदाजपत्रकात पुणे ते मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, हातकणंगले-इचलकरंजी कोल्हापूर – वैभववाडी, कराड-चिपळूण या नवीन रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. पुणे ते मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठीचा निधी वगळता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे रेल्वेने दुर्लक्ष केले.

कोल्हापूर-वैभववाडी, कराड- चिपळूण व हातकणंगले-इचलकरंजी या नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. हे रेल्वे मार्ग होण्यासाठी यावर्षीच्या रेल्वे अंदाजपत्रकात निधीची तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र या नव्या मार्गांना निधीच देण्यात आलेला नाही. हातकणंगले ते इचलकरंजी या केवळ आठ किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गासाठीही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक वर्षार्ंपासून रखडलेल्या या रेल्वे मार्गासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे.

रेल्वे अंदाजपत्रकात पुणे ते मिरज या 280 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी यावर्षीही दोन हजार कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी उड्डाण पुलासाठी सुमारे पाचशे कोटी निधी देण्यात आला आहे. यामुळे रस्ते वाहतुकीला रेल्वे फाटकांचा अडथळा कमी होणार आहे. पुणे-मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी अंदाजपत्रकात तरतूद आहे, परंतु हे काम पूर्ण होण्यास वर्षभर लागणार आहे. पुणे ते मिरज जुन्या रेल्वेमार्गाच्या नूतनीकरणासाठी निधी देण्यात आला आहे.

मिरज मॉडेल स्थानक होण्याकडे दुर्लक्षच

मिरज रेल्वे स्थानक प्रवासी सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. मिरज रेल्वे स्थानकातून दररोज 65 रेल्वे गाड्यांद्वारे हजारो प्रवासी ये-जा करतात. रेल्वे स्थानकात पिण्याच्या पाण्यापासून ते शौचालयापर्यंतच्या अपुर्‍या सुविधांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण वगळता रेल्वे प्रवाशांसाठी सुविधांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार

मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची प्रवासी संघटनांची मागणी आहे. वंदे भारत एक्स्प्रेस पुढील महिन्यात सुरू होणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या बोगी वाढविण्याची घोषणा रेल्वे अंदाजपत्रकात आहे. तसेच मिरज स्थानकातून नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी रेल्वे कृती समितीकडून करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT