Latest

राज्यातील १९३ बस स्थानकांचा होणार कायापालट

backup backup

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा :  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक" अभियानांतर्गत राज्यातील १९३ बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभिकरण होणार असून, यासाठी एमआयडीसी ६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बस स्थानकांचा समावेश असून १४ कोटी ९३ लाख इतका निधीचा खर्च होणार आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर 2 कोटी 22 लाख,इचलकरंजी 3 कोटी 20 लाख,गारगोटी 3 कोटी 66 लाख, नरसिंहवाडी 2कोटी 65 लाख,राधानगरी 3 कोटी 20 लाख निधी खर्चाची तरतूद आहे. अल्पावधीतच या पाच बसस्थानकाचा कायापालट होणार आहे.

राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्वाचा घटक बसस्थानक. या बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( MIDC) यांच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे . या करारप्रसंगी उद्योग मंत्री तथा एमआयडीसीचे अध्यक्ष उदय सामंत, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनोटीया, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व एसटीचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

राज्यभरात एसटीची ६०९ बसस्थानके आहेत. त्यापैकी सध्या ५६३ बसस्थानके कार्यरत आहेत. बसस्थानक परिसरातील खड्डे, पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखल यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. एसटी बसेसचे देखील नुकसान होते. यावर कायमचा उपाय म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आर्थिक मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री नाम. शिंदे यांनी एसटीच्या अमृतमहोत्सवी समारंभात केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात MIDC १९३ एसटी बसस्थानकासाठी कॉक्रिटीकरण करण्यासाठी ५०० कोटी रुपये व रंगरंगोटी ,किरकोळ दुरुस्ती करण्याची १०० कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबविणार आहे. यातून लवकर या सर्व बसस्थानकांचा कायापालट होणार आहे.

एमआयडीसीच्या या प्रतिसाद आणि पुढाकाराचे मुख्यमंत्री नाम. शिंदे यांनी कौतुक केले. "राज्यातील लोकाभिमुख सुविधा देणारी संस्था आणि अग्रेसर अशा उद्योग विभागाचे नवे सहकार्य पर्व सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अशी माहिती जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT