मुंबई; पुढारी वृत्तसेवा : रानडुकरांसाठी लावलेल्या विजांच्या तारांमध्ये अडकून मागील सात वर्षांत 161 वाघांचा मृत्यू झाला आहे. अशा घटनांची दखल घेऊन वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी वन विभाग आता थर्मल तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.
शेतामध्ये येणार्या डुक्कर किंवा अन्य प्राण्यांना रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या वीजभारित तारांच्या कुंपणामध्ये अडकून वाघांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे वाघांना वाचविण्यासाठी वन विभागाने थर्मल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले आहे. प्रायोगिक तत्त्वावर हे तंत्र सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वापरले जात आहे. ताडोबामध्ये थर्मल तंत्रज्ञानाची चाचणी चार महिन्यांपर्यंत केली जाईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हे तंत्र इतर अभयारण्यांमध्ये वापरले जाणार असल्याची माहिती वन विभागातील अधिकार्याने दिली.
राज्यात 444 वाघ आहेत. त्यापैकी एकट्या चंद्रपूरमध्ये 230 वाघ आहेत. वन्यप्राण्यांचे जंगलात 80 टक्के मृत्यू होतात. हे कमी करण्यासाठी जंगलांवर अवलंबून राहणे कमी केले पाहिजे. या दिशेने महाराष्ट्र प्रयत्न करत असल्याचेही या अधिकार्याने सांगितले.
वाघांना ग्रामीण भागात जाण्यापासून रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर एक अद़ृश्य सेन्सर बसवला जाईल. वाघ या सेन्सरमधून बाहेर पडत असल्याचे समजताच संबंधित वन अधिकारी आणि शेतकर्यांना एसएमएस किंवा मोबाईल फोनद्वारे माहिती दिली जाईल.
वाघाने ही 'लक्ष्मण रेखा' ओलांडताच अलार्म सुरू होईल. या प्रकल्पाची किंमत 70 कोटी आहे. सध्या हे तंत्रज्ञान राजस्थानमध्येही वापरले जात आहे. हे सेन्सर दीड किलोमीटरच्या परिघामध्ये काम करेल.