Latest

ठाणे : पेमेंट कंपन्यांना 16 हजार कोटींचा चुना

दिनेश चोरगे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : पेमेंट गेटवे कंपन्यांचे सॉफ्टवेअर हॅक करून पैसे आपल्या खात्यात वर्ग करणार्‍या टोळीतील तिघांना नौपाडा पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. केदार शैलेश दिघे (41, खारघर, नवी मुंबई), संदीप अनंत नकाशे (38, सांताक्रूझ), राम काळूसिंग बोहरा (47, दादर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तब्बल 16 हजार 180 कोटी रुपये स्वतःच्या 250 पेक्षा अधिक बँक खात्यात वळते करणार्‍या टोळीविरोधात ठाण्यातील श्रीनगर आणि नौपाडा पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या रकमेपैकी काही रक्कम परदेशात पाठविल्याचेही तपासातून समोर आले.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात कार्यालय असलेल्या सेफक्सपे या पेमेंट गेटवे कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करून काही सायबर चोरट्यांनी कंपनीच्या खात्यातून तब्बल 25 कोटी रुपये वळते केल्याचा प्रकार दोन आठवड्यापूर्वी ठाण्यात समोर आला होता. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर घटनेचा तपास सायबर सेलच्या पथकाकडे वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना 25 कोटी फसवणुकीच्या रकमेपैकी 1 कोटी 39 लाख 19 हजार 264 एवढी रक्कम ही रियाल इंटरप्राइजेस नाव असलेल्या बँक खात्यामध्ये वर्ग झाल्याचे प्रथमदर्शनी सायबर सेलच्या पथकास आढळून आले होते.

रियाल इंटरप्राइजेसचे कार्यालय वाशी, बेलापूर, नवी मुंबई येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर सेलच्या पथकाने छापा मारून विविध बँक खाते व विविध करारनामे जप्त केले होते. त्यात नौपाडातील काही व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे पाच भागीदारी संस्था स्थापन केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. तसेच रियाल कंपनीचे जवळपास 260 बँक खाते व विविध नोटराईज्ड भागीदारी करारनामे देखील सायबर सेलच्या हाती लागले होते.

मोठी टोळी कार्यरत

तपासात यामध्ये मोठी टोळी असल्याचे स्पष्ट झाले. संजय सिंग, अमोल आंधळे ऊर्फ अमन, केदार ऊर्फ समीर दिघे, जितेंद्र पांडे, संदीप नकाशे, राम बोहरा, नवीन इत्यादींची नावे समोर आली होती. त्यानंतर या टोळीविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. या टोळीतील केदार ऊर्फ समीर दिघे, संदीप नकाशे, राम बोहरा या तिघांना गुरुवारी रात्री अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT