Latest

11 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळणार

Arun Patil

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या 11 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने गुरुवारी दिला आहे.

बंगालच्या उपसागरातून आलेल्या बाष्पयुक्‍त वार्‍यांमुळे मेघालय, कर्नाटक, केरळ, रायलसीमा, अंदमान, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागांत जोरदार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे, तसेच अफगाणिस्तानात पश्‍चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने जम्मू-काश्मीर, हिमालयाच्या पायथ्याशी पाऊस बरसू लागला आहे. मात्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या भागांत 20 मेपर्यंत तीव्र उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्‍त केला आहे.

मान्सून शनिवारी अरबी समुद्राच्या दक्षिण भागात

बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व भागापासून वेगाने आगेकूच करीत असलेला मान्सून अनुकूल परिस्थितीमुळे दोन दिवसांत अरबी समुद्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी गुरुवारी अनुकूल स्थिती प्राप्‍त झाल्याने मध्य पूर्व बंगालच्या उपसागरातून नैऋत्य मोसमी वार्‍यांनी वेगाने दक्षिण अरबी समुद्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 21 मे रोजी (शनिवारी) तो अरबी समुद्राच्या दक्षिण भागात दाखल होईल.

शिवमोग्गासाठी 'रेड अलर्ट'

बंगळूर : हवामान विभागाने कर्नाटकातील शिवमोग्गासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. शहरात 100 मि.मी. ते 150 मि.मी. पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले. अग्‍निशमन आणि आपत्कालीन दलाच्या जवानांचे मदतकार्य सुरू आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्यात अडकलेल्या तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांसाठी बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, शिवमोग्गाचे आमदार के. एस. ईश्‍वरप्पा यांनी भापुजीनगर परिसराची पाहणी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT