Latest

परीक्षा : कॉपीमुक्त अभियानाचे तीनतेरा

Arun Patil

संदीप वाकचौरे,
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

शिक्षण म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा, नैतिक मूल्यांची पेरणी आहे. मात्र ती मूल्यांची वाट आज हरवताना दिसत आहे. आज शिक्षण म्हणजे केवळ टक्केवारीचे कारखाने बनत चालले आहेत. शिक्षण परीक्षाकेंद्रित झाल्याने वाममार्गाच्या प्रकारात वाढ होताना दिसत आहे. या वामवाटेने चालण्यासाठी पालक, शिक्षकच आग्रही राहून बोट धरून चालू लागले तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाशाची वाट कशी दिसणार?

महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा संपत आल्या आहेत आणि दहावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. राज्य सरकारच्या वतीने कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. याचदरम्यान राज्यात काही ठिकाणी काही विषयांचे पेपर फुटले आहेत. समाजमाध्यमावर पेपर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी पेपरफुटीमागे शिक्षकांचा हात असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील एका केंद्रावरून गणिताचा पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधीच बाहेर आल्याचा प्रकार घडला. तिकडे गडचिरोलीतही शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी प्रकरणात सहकार्य करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चक्क केंद्रप्रमुखाने कॉपी करू देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःच्या रूमवर बोलावून प्रत्येकी पाचशे रुपये घेतल्याचे यात दिसत आहे. अशा अनेक सुरस कहाण्या, बातम्या आणि ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमातून आणि वाहिन्यांवरून दाखवल्या जात असून त्यातून शिक्षण क्षेत्राची दिशा स्पष्ट होत आहे. परीक्षेतील वाढते कॉपीचे प्रकार लक्षात घेता हा सारा प्रकार म्हणजे कुंपणच शेत खाऊ लागल्याचे चित्र आहे.

शिक्षण म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा, नैतिक मूल्यांची पेरणी आहे. मात्र ती मूल्यांची वाट आज हरपताना दिसत आहे. आज शिक्षण म्हणजे केवळ गुणांचे कारखाने बनत चालले आहेत. शिक्षण परीक्षाकेंद्रित झाल्याने वाममार्गाच्या प्रकारात वाढ होताना दिसत आहे. या वामवाटेने चालण्यासाठी पालक, शिक्षकच आग्रही राहून बोट धरून चालू लागले तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाशाची वाट कशी दिसणार?

पेपरफुटीचे प्रकार नैतिकतेच्या दृष्टीने तर वाईट आहेतच. पण वर्तमानात शिक्षण अधिक 'अर्थ'केंद्रित होत असल्याने त्याचे दुष्पपरिणाम समाजाला भोगावे लागत आहेत. शिक्षणाचा संबंध व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडण आणि विकासापेक्षा नोकरीशी अधिक जोडला जाऊ लागल्याने शिक्षण आणि शिक्षणातील माणसे नियमबाह्य मार्गाने चालणे पसंत करत आहेत.

शालेय शिक्षण स्तरावर दहावी आणि बारावीच्या परीक्षांना कमालीचे महत्त्व दिले जाते. दरवर्षी लाखो मुले या परीक्षेस प्रविष्ठ होतात. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या जडणघडणीच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा असतो. बारावीनंतर विद्यार्थ्यांस व्यावसायिकदृष्ट्या कोणत्या शाखेस प्रवेश घ्यायचा आहे त्यादृष्टीने या परीक्षेत मिळणार्‍या गुणांना महत्त्व आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी दहावी, बारावी म्हणजे 'करेंगे या मरेंगे' असाच जणू लढा असतो. या परीक्षांमध्ये अधिकाधिक गुण मिळावेत म्हणून विद्यार्थ्यांना शिकवणी लावली जाते. गेल्या काही वर्षांत राज्यभरातील शिकवणी वर्गांची वाढती संख्या डोळे विस्फारणारी आहे. अनेक शिकवणी वर्गांनी शाळा-महाविद्यालयांशी करार केले आहेत. मुले शाळेत प्रवेश घेतात. त्यांची नावे प्रत्यक्ष शाळेच्या पटावर असतात आणि शिकण्यासाठी शिकवणी वर्गात असतात हे उघड गुपित आहे. या शिकवणीच्या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होते आहे. त्यातील आर्थिक स्पर्धा जीवघेणी ठरत आहे.

शिकवणी वर्गाच्या स्पर्धेतून आणि संघर्षातून खून करण्यापर्यंत मजल गेलेली राज्याने अनुभवले आहे. राज्यातील काही गावे आणि शहरे फक्त शिकवणी वर्गासाठी प्रसिद्ध झाली आहेत. काही पालक आपल्याला पाल्याला आयआयटीसारख्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळावा म्हणून राज्याबाहेर शिकवणी वर्गांना प्रवेश घेत आहेत. त्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी पालकांची असते. हा सारा व्यवहार कोट्यवधीच्या घरातील आहेत. यावरून ही परीक्षा किती महत्त्वाची बनली आहे हे सहजतेने लक्षात येईल. एका अर्थाने हे शिकण्यापेक्षाही गुणांना अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे त्यासाठी वाटेल ते करण्याची मानसिकता वाढत चालली आहे.

हे सर्व पाहता शिक्षणाचा मूलभूत अर्थच वर्तमानात हरवला आहे. शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा विकास, उत्तम नागरिकत्वाची निर्मिती. शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास. शिक्षणातून जीवन उन्नतीचा विचार, संस्कार, मूल्यांचे संवर्धन अपेक्षित असते. हे सारे शिक्षणातून हरवत चालले आहे. शिक्षण आनंददायी असते हा अनुभवही हरवत चालला आहे. शिकणे, शिकवणे आणि मूल्यमापन हा शिक्षणप्रक्रियेचा त्रिकोण आहे. त्यांचे एकमेकाशी घट्ट नाते आहे. ते एकमेकापासून अलग करता येणार नाही. मूल्यमापन म्हणजे मूल कसे शिकते आणि किती शिकले आहे हे जाणून घेण्याची प्रक्रिया आहे. पण तो विचार हरवत जाऊन अलीकडच्या काळात संपूर्ण शिक्षण हे परीक्षाकेंद्रित झाल्यानेच गैरमार्गाने जाणे पसंत केले जात आहे. शिक्षणाच्या मूलभूत ध्येयापासून दूर जाणे घडत गेल्याने कॉपीसारखे प्रकार वाढत आहेत.

राज्य सरकारच्या वतीने कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समन्वयातून जिल्ह्यात विविध स्वरूपाची कार्यवाही सुरू आहे. परीक्षा पेपरफुटीचे वाढते प्रकार शिक्षण प्रशासनातील ढिसाळपणा दर्शवणारे आहेत. विद्यार्थ्यांना आपले भविष्य आपणच घडवायला हवे ही जाणीव रुजवण्यात शिक्षण कमी पडत आहे. 'बाळा, एक वेळ मार्क नाही मिळाले तरी चालतील, पण प्रामाणिकपणाची कास सोडू नको' अशी म्हणणारी आई घराघरांत होती. आजच्या बहुतांश मम्मींना फक्त मार्क हवे आहेत. त्यामुळे जोवर आपण प्रामाणिकपणाच्या पायावर उभे राहिलेले समाजमन घडवत नाही, तोवर ही गुणांची स्पर्धा कायम राहील. स्पर्धा आहे म्हटल्यावर गैरमार्गाचा वापर अनिवार्यच आहे, अशी विचारसरणी घातक आहे. शिक्षणातून मूल्यांच्या विचारांची पेरणी आवश्यक आहे. आपल्या पाल्यांवर अपेक्षांचे ओझे न लादता त्यांना नैसर्गिकरीत्या शिकू देण्यासाठी मोकळी वाट दाखविण्याची गरज आहे. गुण म्हणजे गुणवत्ता नाही हा विचार पेरला जाण्याची गरज आहे. पण ज्यांनी सत्याची वाट दाखवायची, तेच असत्याच्या वाटेने चालू लागले तर भविष्याचे काय होणार?

SCROLL FOR NEXT