Latest

पुणे : बेल्हे येथील मल्टीस्टेट सोसायटीच्या लॉकरमधून १०० तोळे सोने गायब

रणजित गायकवाड

आळेफाटा; पुढारी वृत्तसेवा : बेल्हे (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील एका मल्टीस्टेट सोसायटीच्या लॉकरमधून १०० तोळे सोने गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आळेफाटा पोलिसांनी तात्काळ सोसायटीतील एक संशयीत कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले असून इतर कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरु आहे. शुक्रवारी (दि. १) हा प्रकार समोर आला असून सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून सोने गायब केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.

याबाबत समजलेली अधिकची माहिती अशी की, बेल्हे येथील एका मल्टीस्टेट सोसायटीच्या लॉकरमधून मोठ्या प्रमाणावर सोने गायब झाल्याबाबत आळेफाटा पोलिसांना कळवण्यात आले. शुक्रवारी पोलिसांनी याबाबत तपास केला असता सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरे चोरीपूर्वी काही वेळ बंद करून सोने गायब केल्याचे तपासात समोर आले. सीसीटीव्हीत सोसायटीचा एक कर्मचारी डीव्हीआर बंद आणि चालू करताना कैद झाला आहे. पोलिसांनी सबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले असून सोसायटीतील इतर कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे.

लॉकरमधून १०० तोळ्यापेक्षा अधिकचे सोने गायब झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आळेफाटा पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सायंकाळपर्यंत पोलिसांचा तपास सुरु होता. संशयीत कर्मचाऱ्यासोबत आणखी कोण या कटात सहभागी आहे का याचा तपास केला जात आहे. मात्र, अद्याप तपास सुरू असून चौकशीनंतरच गुन्हा दाखल करण्यात येतील, असे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

SCROLL FOR NEXT