Latest

पुणे : ‘अ‍ॅग्रो वेस्ट’पासून 10 हजार लिटर बायोडिझेल!

Arun Patil

पुणे : दिनेश गुप्ता : खाद्यपदार्थातील वाया जाणार्‍या अनेक टाकाऊ पदार्थांपासून बायोडिझेल तयार करण्यात पुण्यातील चार अभियंत्यांना यश आले आहे. तयार झालेले बायोडिझेल हे नैसर्गिक स्वरूपाचे असून त्याचा वापर कारखान्यांसाठी करण्यात येत आहे. या संशोधनामुळे दररोज दहा हजार बायोडिझेल तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.

पुणे येथील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या माध्यमातून चार संशोधक मित्रांनी एकत्र येत 'अ‍ॅग्रो वेस्ट' अर्थात वाया जाणार्‍या कृषी खाद्यपदार्थांपासून बायोडिझेल तयार करण्याचा प्रयोग सुरू केला. मात्र, त्यांच्याकडे आर्थिक व तांत्रिक बळ नसल्याने त्यांनी पुण्यातील सायन्स व टेक्नॉलॉजी पार्कचे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांची भेट घेतली. डॉ. जगदाळे यांना या तरुण अभियंत्यांची कल्पना आवडली. त्यांनी या चौघांना सीड फंडिंगच्या माध्यमातून आर्थिक व तांत्रिक साह्य केले. सन 2016 पासून सुरू असलेल्या या प्रयोगाला 2018 मध्ये यश आले. खाद्यपदार्थातील सोयाबीन तेल, हॉटेलमधील उरलेले द्रवयुक्त पदार्थ अशा टाकाऊ पदार्थांचा उपयोग करून त्यातून बायोडिझेल, गॅस व एलपीजीसारखा गॅस असे तीन पदार्थ वेगळे काढले. त्यातून शंभर टक्के पर्यावरणपूरक असे बायोडिझेल तयार करण्यात यश मिळविले.

असे तयार होते बायोडिझेल

व्ही. एस. श्रीधर, एस. राघवन, राधिका राघवन, सेतूनाथ रामास्वामी या चार अभियंत्यांनी एकत्र येत हा प्रयोग सहा वर्षांपूर्वी सुरू केला. यात अ‍ॅग्रोवेस्टपासून बायोडिझेल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एका उच्च तापमानाच्या रिअ‍ॅक्टरमध्ये अ‍ॅग्रो वेस्ट टाकून ते थर्मल क्रॅकिंग प्रोसेस पद्धतीने उकळले जाते. त्यात उत्प्रेरक टाकताच बायोडिझेल, पेट्रोल आणि गॅस तयार होतात. यातून बायोडिझेल हे पर्यावरणपूरक इंधन निर्माण झाले. सध्या दिवसाकाठी 10 हजार लिटर बायोडिझेल पुण्यात तयार केले जाते.

तांदूळ, खाण्याचे विविध पदार्थ, तळलेले तेल तसेच हॉटेलमधील उरलेले अन्न फेकून दिले जाते. हे अन्नपदार्थ गोळा करून आम्ही यातून बायोडिझेल तयार करतो. गोळा केलेल्या कचर्‍यातून 50 टक्के इतके बायोडिझेल निघते. 2018 मध्ये पुण्यात देशातील सर्वप्रथम प्रयोग हा आम्ही केला आहे. यासाठी सायन्स व टेक्नॉलॉजी पार्कचे आर्थिक व तांत्रिक सहकार्य लाभले आहे.
– व्ही. एस. श्रीधर, संशोधक

पुण्यातील या चार तरुण अभियंत्यांनी माझ्याकडे येऊन त्यांचे प्रयोग सादर केले. त्या संशोधनावर अभ्यास करून तो मंजुरीसाठी दिल्लीकडे पाठवण्यात आला. आता हा प्रयोग यशस्वी झाला असून लवकरच देशपातळीवर नेण्याचा प्रयत्न राहील.
– डॉ. राजेंद्र जगदाळे,
संचालक, सायन्स व टेक्नॉलॉजी पार्क, पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT