Latest

कोल्हापूर : फॉरेक्स वेल्थकडून 1 कोटीची फसवणूक : एकास अटक

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गुंतवलेल्या रकमेवर गुंतवणूकदारांना दरमहा पाच टक्के व्याज परतावा आणि पाच टक्के मुद्दल देण्याचे आमिष दाखवून ताराबाई पार्क येथील फॉरेक्स वेल्थ शेअर ट्रेडिंग कंपनीने गुंतवणूकदारांची एक कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार संजय सॅलो कास्टो (वय 57, रा. हल्याळ, जि. कारवार, कर्नाटक) यांनी रविवारी (दि. 3) रात्री शाहूपुरी पोलिसात दिली. या प्रकरणात पोलिसांनी गंगाराम पितांबर दंडी याला अटक केली. तसेच फॉरेक्स वेल्थ सोल्युशन कंपनीच्या सहा संशयितांवर गुन्हा दाखल केला.

सुरुवातीचे काही दिवस परतावा देत गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून गंडा घालण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीने अनेक गुंतवणूकदारांचे पैसे हडप केले असून गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक गंगाराम पितांबर दंडी (वय 50, रा. औरनाळ, ता. गडहिंग्लज), स्वप्नील गजानन माताडे (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर), सोनिया विश्वनाथ हत्ते (रा. कुपवाड रोड, सांगली), दीपक शिवाजी गजाकोश (रा. आर. के. नगर, कोल्हापूर), प्रसाद परशराम सोनके (रा. साधना कॉलनी, गडहिंग्लज) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. त्यापैकी दंडी याला पोलिसांनी अटक केली.

संजय कास्टो आणि त्यांच्या नातेवाईकांनी 13 मे 2021 ते डिसेंबर 2023 या कालावधीत फॉरेक्स वेल्थ सोल्युशन ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतवले. गुंतवलेल्या रकमेवर दरमहा पाच टक्के परतावा आणि पाच टक्के मुद्दल अशी रक्कम देण्याचा करार कंपनीने गुंतवणूकदारांसोबत केला होता. सुरुवातीचे काही महिने परतावे मिळाल्यामुळे कास्टो यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी बँकांमधून कर्ज काढून व दागिने गहाण ठेवून काढलेले पैसे फॉरेक्समध्ये गुंतवले. मात्र वर्षभरापासून परतावे मिळणे बंद झाले. मुद्दलही परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. सहा संशयितांवर गुन्हा दाखल केला असून संशयितांचा शोध सुरू असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT