Latest

कृषी उत्पन्न बाजार समित्यांची रँकिंग प्रथमच जाहीर, राज्यात लासलगाव प्रथम तर हिंगणघाट दुसरी बाजार समिती

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत (स्मार्ट) राज्यातील बाजार समित्यांची सन 2021-22 या वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी (रँकिंग) पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील एकूण 305 बाजार समित्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील लासलगांव बाजार समितीने प्रथम क्रमांक पटकाविला असून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीने दुसरा तर वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) बाजार समितीने तिसरा क्रमांक मिळविला आहे.

राज्यामध्ये प्रथमच अशा प्रकारे बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती पणन संचालक सुनिल पवार यांनी दिली. जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यामध्ये स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु आहे. स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांपैकी राज्यातील बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी प्रसिध्द करणे हा एक महत्वाचा उपक्रम आहे. यामुळे बाजार समित्यांची योजना, उपक्रमाबाबतची माहिती पणन संचालनालयाकडे प्राप्त झालेली असून याचा उपयोग पणन व्यवस्थेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी होऊ शकणार आहे.

बाजार समित्यांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालय कार्यालयाकडून जागतिक बँकेच्या सूचनेनुसार तसेच शेतकर्‍यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेमध्ये बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना, उपक्रम राबविण्यातील सहभाग यानुसार 35 निकष तयार करण्यात आलेले होते.या निकषांच्या माहितीची संबंधित तालुका उप-सहाय्यक निबंधकांकडून तपासणी करुन एकूण 200 गुणांपैकी गुण देण्यात आलेले आहेत. या गुणांच्या आधारावर राज्यातील बाजार समित्यांची सन 2021-22 या वर्षाची क्रमवारी निश्चित करण्यात आलेली आहे. त्या क्रमवारीनुसार राज्यातील पहिल्या 10 बाजार समित्यांची नांवे व कंसात त्यांना मिळालेले गुण खालीलप्रमाणे आहेत.

लासलगांव-नाशिक(163), हिंगणघाट-वर्धा(161.50), कांरजा लाड-वाशिम (161), संगमनेर-अहमदनगर (157), मंगरुळपीर-वाशिम (157), चांदूर बाजार-अमरावती (157), वाशिम-वाशिम (157), काटोल-नागपूर (156), अकोला-अकोला (155.50), उमरेड-नागपूर (155), लातूर-लातूर (150), बारामती-पुणे (149.50), पिंपळगांव ब.-नाशिक(148.50) या बाजार समित्यांचा समावेश आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधा व इतर सेवा सुविधा निकषांसाठी 80 गुण, आर्थिक कामकाज निकष 35 गुण, वैधानिक कामकाज निकष 55 गुण, इतर निकष 30 गुण मिळून एकूण 200 गुणांपैकी बाजार समित्यांना गुण देऊन ही क्रमवारी निश्चित करण्यात आलेली आहे.

राज्यातील सहकार विभाग रचनेनुसार 8 विभागातील प्रथम 3 बाजार समित्यांची नांवे जिल्हानिहाय पुढीलप्रमाणे आहेत-
नाशिक विभाग: लासलगांव-नाशिक, संगमनेर-अहमदनगर, पिंपळगांव ब.-नाशिक. पुणे विभाग ः बारामती-पुणे, दौंड-पुणे, अकलूज-सोलापूर.
औरंगाबाद विभाग : बसमत-हिंगोली, भोकरदन-जालना, लासुर स्टेशन-औरंगाबाद.
लातूर विभाग : लातूर-लातूर, किल्ले धारुर-बीड, उदगीर-लातूर.
कोल्हापूर विभाग : सांगली-सांगली, फलटण-सातारा, आटपाडी-सांगली
कोकण विभाग : मुंबई(तुर्भे)-ठाणे, मुरबाड-ठाणे, कल्याण-ठाणे.
नागपूर विभाग : हिंगणघाट-वर्धा, काटोल-नागपूर, उमरेड-नागपूर.
अमरावती विभाग : कारंडा (लाड)-वाशिम, चांदुर बाजार-अमरावती, वाशिम-वाशिम, मंगरुळपीर-वाशिम, अकोला-अकोला. यातील चांदुर बाजार, वाशिम, मंगरुळपीर समितीला 157 एवढे सारखेच गुण मिळाले आहेत.

राज्यातील कृषी बाजार व्यवस्थेतील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. यापुढे दरवर्षी अशा प्रकारे बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर करण्यात येणार आहे. यावर्षी जाहिर करण्यात आलेल्या क्रमवारीच्या अनुभवाच्या आधारावर पुढील वर्षी क्रमवारीच्या निकषात आणि गुणांकन पध्दतीत आवश्यकतेनुसार काही सुधारणा करण्यात येणार आहेत.

"बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर झाल्यामुळे इतर बाजार समित्यांच्या तुलनेत आपण शेतमाल नेत असलेल्या बाजार समितीचे स्थान शेतकर्‍यांना समजणार आहे. तसेच यामुळे शेतकर्‍यांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा बाजार समित्यांमध्ये निर्माण होण्यास चालना मिळेल. बाजार समितीचा विकास करताना नेमक्या कोणत्या बाबींना प्राधान्य दयायचे आहे, याची स्पष्टता या क्रमवारीमुळे बाजार समित्यांच्या संचालक मंडळास येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बाजार समित्यांचे अभिनंदन.
– सुनिल पवार, पणन संचालक, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT