इस्लामाबाद : पाकिस्तानातील सर्वात प्रमुख शहरांपैकी एक लाहोर हे भगवान रामाचे पुत्र लव याने वसवलेले शहर असल्याचे मानले जाते. या शहराचा प्राचीन इतिहास भारतीय संस्कृतीशी जोडला जातो. यापूर्वीही भारतात यावर चर्चा झाली होती. मात्र, यावेळी खुद्द पाकिस्तानी मीडियानेच हे सत्य स्वीकारले आहे.
'द डॉन' या मुस्लिम लीग समर्थित वृत्तपत्रातील एका रिपोर्टमध्ये लाहोर शहराच्या प्राचीन इतिहासाचा शोध घेण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, लाहोर हे राजकुमार लव यांनी वसवले होते आणि त्यांच्या नावावरून शहराला 'लाहोर' हे नाव पडले. तसेच, पाकिस्तानी शहर 'कसूर' हे भगवान रामाचे दुसरे पुत्र कुश यांनी वसवलेले शहर होते. याशिवाय या शहरातील अनेक जुनी मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूंची माहिती सांगितली गेली आहे. सामान्यतः पाकिस्तान आणि पाकिस्तानी मीडिया तिथला प्राचीन इतिहास नाकारतात. अगदी सिंधू संस्कृतीबद्दलही पाकिस्तानात फारसे बोलले जात नाही.
मुहम्मद बिन कासिमच्या आधीच्या इतिहासाला ते 'अंधारयुग' म्हणतात. यामुळेच पाकिस्तान आजवर जुना इतिहास स्वीकारण्याचे टाळत आला आहे. मात्र, आता आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानी मीडियामध्ये याची चर्चा होत आहे. लाहोर किल्ल्यातील लव मंदिर ही लाहोरमधील सर्वात जुनी इमारत आहे. हे मंदिर किल्ल्याच्या निर्मितीच्या खूप आधीपासून येथे होते. मुघल काळात सम्राट अकबराने आजूबाजूला आणखी किल्ले बांधले. त्यानंतर हे मंदिरदेखील किल्ल्याचा एक भाग बनले. परंतु, मंदिराची रचना आणि सध्याच्या शहराच्या पृष्ठभागापासून त्याची उंची यावर आधारित असे मानले जाते की, हे मंदिर किल्ल्यापेक्षा बरेच जुने आहे.