Latest

Kylian Mbappe 300 Goals : एम्बाप्पेचा विक्रम! 300 गोल करणारा सर्वात तरुण फुटबॉलपटू ठरला

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kylian Mbappe 300 Goals : फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू कायलियन एम्बाप्पेने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याबाबतीत त्याने पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी मागे टाकले आहे. एम्बाप्पे हा वेगवान 300 गोल करणारा जगातील सर्वात तरुण फुटबॉलपटू बनला आहे. त्याने वयाच्या 24 वर्षे 333 दिवसांत हा पल्ला गाठला आहे. त्याच्या आधी रोनाल्डोने वयाच्या 27 व्या वर्षी तर मेस्सीने आणि ब्राझीलच्या नेमारने वयाच्या 25 व्या वर्षी 300 गोल आपल्या खात्यात जमा केले होते.

नुकत्याच झालेल्या युरो कप पात्रता फेरीच्या सामन्यात जिब्राल्टरविरुद्ध तीन गोल करून त्याने ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. त्या सामन्यात फ्रान्सने जिब्राल्टरचा 14-0 अशा गोल फरकाने धुव्वा उडवला. या सामन्यात एम्बाप्पेने हॅट्ट्रीक करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. (Kylian Mbappe 300 Goals)

एम्बाप्पेच्या कामगिरीचे कौतुक करताना फ्रान्सचे माजी विश्वकप विजेते खेळाडू थिएरी हेन्री यांनी कौतुगोद्गार काढले आहेत. ते सध्या फ्रान्सच्या अंडर-21 संघाचे प्रशिक्षक आहेत. ते म्हणाले की, 'एम्बाप्पे जे काही करतोय ते कल्पनेपलीकडचे, आश्चर्यकारक आहे. युरोपमधील अव्वल पाच लीग आणि आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये 300 गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे; हे अविश्वसनीय आहे. 18 व्या वर्षी विश्वचषक विजेता खेळाडू बनलेल्या या मुलाची प्रतिभा दिवसेंदिवस बहरत चालली आहे. मेस्सी आणि रोनाल्डो पेक्षाही एम्बाप्पे हा गोल करण्यात वेगवान आहे,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. (Kylian Mbappe 300 Goals)

'एमबाप्पे एक गोल स्कोअरर आणि उत्कृष्ट सहाय्यक देखील आहे. मैदानावरची त्याची चपळता डोळ्याचे पारणे फेडणारी असते. एमबाप्पेने कारकिर्दीतील 17वी हॅट्ट्रिक केली आणि या मोसमात खेळल्या गेलेल्या 19 सामन्यांमध्ये एकूण 21 गोल केले. ही गोल आकडेवारी त्याच्या खेळाची साक्ष देते,' असेही हेन्री यांनी सांगितले.

कारकिर्दीच्या सुरुवातीला एमबाप्पेची तुलना हेन्रीशी करण्यात आली होती. मोनॅको येथे लेफ्टविंगर म्हणून खेळण्यापूर्वी दोघांनी फ्रान्समधील क्लेअरफॉन्टेन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले. जिथे दोघांनी किशोरवयात फ्रेंच लीगचे विजेतेपद जिंकण्यात मोलाची भूमिका पार पाडली. एमबाप्पेने 2018 मध्ये आपल्या पहिल्याच विश्वचषकात विजेतेपदाला गवसणी घातली. तर हेन्री हे 1998 च्या विश्वचषक विजेत्या फ्रान्स संघाचे खेळाडू होते. एम्बाप्पेची तुलना दिवंगत ब्राझिलियन फुटबॉलपटू पेले यांच्याशी देखील केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT