– अवंती कारखानीस
आरबीआयकडून खातेधारकांची माहिती वेळोवेळी गोळा केली जाते. एखाद्या ग्राहकाच्या खात्यात मोठी रक्कम असेल आणि त्यात व्यवहारदेखील खूप होत असेल, तर त्या खात्याला केवायसी अपडेट करण्याची प्रक्रिया करणे गरजेचे आहे. एखाद्या बँक ग्राहकाने आपल्या खात्याचे केवायसी व्हेरिफिकेशन केले नसेल, तर ते काम लवकरात लवकर मार्गी लावले पाहिजे; अन्यथा खात्यातील व्यवहार अडचणीत येऊ शकतात.
केवायसी (नो यूवर कस्टमर)ची प्रक्रिया पूर्ण न केल्याने अनेकांना महत्त्वाच्या क्षणी पैसे काढता आले नसल्याचे आरबीआयच्या निदर्शनास आले. एखाद्या व्यवहाराबाबत बँकेला शंका आली तर बँक किंवा आरबीआय संबंधित खातेधारकाकडे विचारणा करू शकते. मात्र केवायसी अपडेट नसल्यास संपर्क होऊ शकत नाही म्हणून ग्राहकांनी खात्याची माहिती वेळोवेळी अपडेट करत राहावी, अशा सूचना दिली जाते. मेसेज, मेल, फोनकॉल आदी माध्यमातून माहिती दिली जाते. याउपरही अपडेट केले नाही, तर खाते गोठविले जाते. बनावट केवायसीचे मेसेज अनेकांना येतात. यापासूनही खबरदारी घेत केवायसीची प्रक्रिया करावी. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा शाखेत जाऊन केवायसी पूर्ण करावे.
बँकिंग क्षेत्रातील सूत्रानुसार सध्यातरी आरबीआयकडून कडक धोरण अमलात आणले जात नाही कारण केवायसीची पूर्तता करण्यासाठी जून महिन्यांपर्यंतचा कालावधी दिला आहे. जूननंतर आरबीआयला एखाद्या खात्यात मोठी रक्कम असल्याचे दिसत असेल, व्यवहार खूप होत आहेत; परंतु केवायसी नसेल तर अशा वेळी संबंधित खात्यावर आरबीआयकडून कारवाई होऊ शकते. एवढेच नाही, तर प्रसंगी खाते गोठविलेदेखील जाऊ शकते.