Nashik Kumbh Mela Pudhari
महाकुंभ

Simhastha Kumbh Mela 2027: 13 आखाड्यांच्या भोजनाची जबाबदारी शिवसेना उचलणार, शिंदेंची घोषणा

Simhastha Kumbh Mela | 13 आखाड्यांच्या भोजनाची जबाबदारी शिवसेना उचलणार : शिंदे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
"राजत्तेचा अहंकार चालत नसून, संतांच्या चरणी लीन होऊन जनसेवा करणे हीच आमची सत्तानीती आहे; राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता सदैव श्रेष्ठ राहील," असा थेट व प्रभावी संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीतून दिला. १३ आखाड्यांच्या संत-महंतांच्या भोजनाची संपूर्ण व्यवस्था शिवसेनेच्या वतीने करण्याची घोषणा करून थेट त्यांनी यावेळी साधुसतांना साद घातली.

दुसरीकडे कुंभमेळाच्या पायाभूत विकासकामांतून विस्थापित होणाऱ्या स्थानिकांना पक्की घरे आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याची ग्वाही देत स्थानिक असंतोषावर वेळेत फुंकर घातली.
त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी (दि. २६) आयोजित संत संमेलनात ते बोलत होते.

यावेळी जगद्गुरू महामंडलेश्वर स्वामी शांतिकिरी महाराज, महंत महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, महंत सत्यगिरी महाराज, महंत धनंजयगिरी महाराज, महंत शंकरानंद सरस्वती महाराज, महंत रमेशगिरी महाराज, महंत दुर्गाानंद महाराज, महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत दुर्गादास महाराज, महंत रामनवमीदास महाराज, महंत गोपालदास महाराज, संत देवेंद्रसिंह शास्त्री, धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांसह मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, गोकुळ गिते, जिल्हाप्रमुख अजय बोर्स्ते, विजय करंजकर, विजय आमले, प्रवीण आमले आदी उपस्थित होते.

भगवान त्र्यंबकेश्वर आणि गोदामाईला वंदन करून भाषणाला सुरुवात करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 'अध्यात्मिक ऊर्जेचा उत्सव' संमेलनाला 'ऐतिहासिक व दिमाखदार पद्धतीने पार पाडला जाईल, असा निर्धार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शेवटी व्यक्त केला. बाळसाहेब ठाकरे यांनी राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे, तर समाजकारण, राष्ट्रसेवा आणि राष्ट्ररक्षणासाठी करण्याचे संस्कार आम्हाला दिले, असे सांगत त्यांनी आपल्या मूळ राजकीय भूमिकेचा पुनरुच्चार केला.

मी स्वतःला कधीही मोठा नेता मानले नाही; सीएम म्हणजे 'कॉमन मॅन'. कालही कार्यकर्ता होतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहीन, या शब्दांत त्यांनी तळागाळातील लोकांसाठी काम करत राहणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. कुंभमेळा हा केवळ धार्मिक विधी नसून तो स्थानिक रोजगार, पर्यटन, व्यापार आणि पायाभूत सुविधांचा कायापालट करणारा आर्थिक महोत्सव ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सहकार्याने हा सिंहस्थ कुंभमेळा ऐतिहासिक व दिमाखदार पद्धतीने पार पाडला जाईल, असा निर्धार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शेवटी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या घोषणा:

  • कुंभमेळाच्या विकासकामांत विस्थापित किंवा बाधित होणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला पक्के घर देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाईल.

  • साधुग्राम भूसंपादनातील तक्रारी तातडीने निकाली काढल्या जातील; तसेच प्रकल्पामुळे बाधित शेतकरी व दुकानदारांना योग्य मोबदला मिळेल.

  • त्र्यंबकेश्वर येथील क्रीडा संकुलासाठी (स्टेडियम) भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी पुरेशा निधी मंजूर केला आहे.

  • त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक सर्व निधी शासन उपलब्ध करून देईल.

  • दुष्काळग्रस्त भागातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मुलीच्या विवाहासाठी शिवसेना मदतीचा हात पुढे करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT