Nashik Kumbh Mela Live Updates
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महापर्वाचा औपचारिक प्रारंभ आज (दि. ३१) रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाने होणार आहे, तर त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी अभिजित मुहूर्तावर धर्मध्वजाची स्थापना केली जाणार असून, यावेळी गोदावरी पूजन आणि यज्ञविधीही पार पडतील.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओझर विमानतळावर पोहोचल्या आहेत. यानंतर रामतीर्थ परिसरात सिंहस्थ धर्मध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती आणि दुपारी १२.०२ वाजता मुख्य ध्वजस्थापना होईल. दुपारी १२.३० वाजता त्या पुन्हा एमपीए अतिथिगृहात येतील. दुपारी २ वाजता त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर गोदापूजन, तर २.३० वाजता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन व धार्मिक विधी होतील. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता एमपीए अतिथिगृहात परतल्यानंतर पुढील कार्यक्रमांसाठी हालचाली सुरू होतील. सायंकाळी ५.३० वाजता सार्वजनिक कार्यक्रम आणि गोदावरी महाआरतीच्या सोहळ्यात राष्ट्रपती सहभागी होणार आहेत.
वेळ आणि नियोजित कार्यक्रम
सकाळी ९.०० - नाशिक विमानतळावर आगमन
सकाळी १०.०० - महाराष्ट्र पोलीस अकॅडमी (एमपीए) अतिथिगृह येथे आगमन
सकाळी ११.०० - रामतीर्थ, नाशिक येथे धर्मध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती
दुपारी १२.०२ - अभिजित मुहूर्तावर रामकुंड येथे धर्मध्वजारोहण
दुपारी १२.३० - एमपीए अतिथिगृह येथे आगमन
दुपारी २.०० - कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर येथे गोदापूजन
दुपारी २.३० - त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन व पूजाविधी
दुपारी ४.०० - एमपीए अतिथिगृह येथे आगमन
सायंकाळी ५.३० - सार्वजनिक कार्यक्रम, शंखनाद, सांस्कृतिक कार्यक्रम व गोदावरी
गंगापूजनानंतर राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ ध्वजारोहण केले जाणार आहे. हा सोहळा सुमारे पाच मिनिटांचा असणार आहे. ध्वजारोहण सोहळ्यानंतर औपचारिकरित्या कुंभपर्वास प्रारंभ होणार असून हे कुंभपर्व पुढील वर्षभर सुरू राहणार आहे. दरम्यान, ध्वजारोहण सोहळ्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते गोदावरीची महाआरती केली जाणार आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांचे रामकुंडावर आगमन होणार आहे. यावेळी त्या गौतमी गोदावरी मंदिर परिसरात होणाऱ्या यज्ञपूजा करणार असून यज्ञात राष्ट्रपतींच्या हस्ते समिधाही अर्पण केल्या जाणार आहे. सुमारे १० मिनिटांच्या या विधीसाठी पुरोहित संघाचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार असून सुहास शुक्ल हे यजमान म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औपचारिक प्रारंभानिमित्त शनिवारी (दि.३१) सायंकाळी गोदावरीच्या तीरावर होणाऱ्या भव्य महाआरती सोहळ्यात देशातील प्रमुख धर्माचार्य, जगद्गुरू आणि तेरा आखाड्यांचे साधू-महंत एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी शृंगेरी पीठाचे शंकराचार्य विदुशेखर भारती यांच्यासह चार जगद्गुरू आणि शैव-वैष्णव परंपरेतील सर्व तेरा आखाड्यांचे प्रतिनिधी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
धर्मध्वज सोहळा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सोहळ्यासाठी तब्बल पाच हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी सज्ज झाला आहे. यामध्ये नाशिक शहर पोलिस दलातील तीन हजार, तर बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्या दोन हजार पोलिसांचा समावेश आहे. राष्ट्रपतींचा ओझर विमानतळ ते नाशिक असा प्रवास मोटारीने होणार असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र ७०० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
नगरसेवकांना बसण्यासाठी नियोजन नसल्याने झाले आक्रमक
नगरसेवकांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेत व्यक्त केली नाराजी
ज्या ठिकाणी नगरसेवकांना बसण्याचे पास देण्यात आले होते त्या ठिकाणी प्रवेश नाकारल्याने नगरसेवक झाले नाराज
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण कार्यक्रमात प्रशासनाकडून नियोजनाचा फज्जा
सायंकाळी ५.३० वाजता सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होतील. यावेळी शृंगेरीपीठाचे शंकराचार्य विदुशेखर भारती यांच्यासह चार जगद्गुरू आणि तेरा आखाड्यांचे साधू-महंत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. सुमारे दोनशे वर्षांनंतर शैव-वैष्णव परंपरेतील संत-महंत एकत्र येत असल्याचा दावा करण्यात येत आहे
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याची सुरुवात ध्वजारोहणाने होणार असून या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ओझर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी राज्यपाल डॉ. जिष्णु देव वर्मा यांनी त्यांचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार भास्कर भगरे,आमदार दिलीप बनकर, आमदार सुहास कांदे, उपमहापौर विलास शिंदे, जलसंपदा सचिव एकनाथ डवले, अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेशकुमार, हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिरकुमार पात्रा, स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल एन. एस. सराना, एअर कमाडोर विक्रम सिंग, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते.