Latest

KSA Football League : प्रॅक्टिसकडून पाटाकडील पराभूत

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  अटीतटीच्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने पाटाकडील तालीम मंडळाला कडवे आव्हान देत त्यांचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीगमधील पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का दिला. तत्पूर्वी, झालेल्या सामन्यात उत्तरेश्वर तालीम मंडळाने ऋणमुक्तेश्वर संघाचा एकमेव गोलने पराभव केला.

पाटाकडील-प्रॅक्टिसच्या सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी जलद व आक्रमक खेळाचा अवलंब केला. योजनाबद्ध चाली रचत आघाडीसाठी खोलवर चढाया केल्या. मात्र, दोन्हीकडून भक्कम बचाव असल्याने यश आले नाही. 19 व्या मिनिटाला पाटाकडीलकडून झालेल्या चढाईत प्रथमेश हेरेकरच्या पासवर रोहित पोवारने गोल नोंदवत 1-0 अशी आघाडी मिळविली. ही आघाडी फार काळ टिकली नाही. प्रॅक्टिसकडून 27 व्या मिनिटाला सागर पोवारने मोठ्या डी बाहेरून गोलीच्या डोक्यावरून गोलपोस्टचा थेट वेध घेतला. फटका रोखण्याच्या प्रयत्नात गोलरक्षक मोहम्मद खान गोलपोस्टवर आदळून जखमी झाला. मध्यंतरापर्यंत सामना 1-1 बरोबरीत होता.
उत्तरार्धात पुन्हा सामन्याचा वेग वाढला. प्रॅक्टिसच्या गोलक्षेत्रात अवैधरीत्या रोखल्याने मिळालेल्या पेनल्टीचे रूपांतर ओंकार मोरेला गोलमध्ये करता आले नाही. प्रॅक्टिसकडून 83 व्या मिनिटाला झालेल्या खोलवर चढाईत ओंकार जाधवने मारलेला फटका रोखण्याच्या प्रयत्नात ओंकार मोरेकडून स्वयंगोल झाल्याने सामना प्रक्टिसने 2-1 असा जिंकला.

तत्पूर्वीच्या सामन्यात उत्तरेश्वर तालीम मंडळाने ऋणमुक्तेश्वर संघाचा एकमेव गोलने पराभव केला. मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता. उत्तरार्धात 72 व्या मिनीटाला कोनान कोफी याने विजयी गोलची नोंद केली. सामन्यात उत्तरेश्वरच्या स्वराज पाटील, अक्षय शिंदे, सोहेल शेख, ओलू मेड यांनी तर ऋणमुक्तेश्वरच्या आयुष चौगुले, विकी जाधव, फ—ॅन्की डेव्हीड, प्रतिक साबळे यांनी उत्कृष्ठ खेळ केला.

उत्कृष्ट खेळाडू व लकी फुटबॉलप्रेमी

उत्कृष्ट खेळाडू म्हणून अक्षय शिंदे (उत्तरेश्वर) व ज्युलियस स्ट्रो (प्रॅक्टिस) यांना तर लकी फुटबॉलप्रेमी म्हणून ओंकार काटकर यांना गौरविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT