कोपरगाव, पुढारी वृत्तसेवा: कोपरगाव शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीच्या ऐरणीवर असतो. राज्यात यापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे तीन चाकी सरकार होते. आता मात्र पारडे अडीच वर्षांनंतर बदलले आहे. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकार कोपरगाव नगरपालिकेच्या पाचव्या साठवण तळ्याच्या प्रश्नाला प्राधान्य देते की निळवंडे- शिर्डी – कोपरगाव पाईप लाईनचे काम हाती घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादचा कार्यभार उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे यांच्या खांद्यावर येऊन पडला असून ते काय भूमिका घेणार? औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित कोपरगावच्या पाण्याच्या याचिकेत सरकारच्या वतीने कुठले प्रतिज्ञापत्र दाखल करणार? हा देखील औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
कोपरगाव शहराची त्रिशंकू हद्दवाढ करून लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या एक लाखाच्या वर गेली आहे. तर सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालय, ब्रिजलालनगर, कोपरगाव बेट भाग, वडांगळे वस्तीपासून पुढे शहरीकरणाची हद्दवाढ होऊन बंगल्यांचे साम्राज्य वाढते आहे. पण प्यायला पाणी नसल्याने त्याला ग्राहकांचा प्रतिसाद कमी आहे. शहराला येसगाव साठवण तळ्यातून प्यायला पाणी येते. 42 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना 52 कोटींवर जाऊन पोहोचली आहे. तिचे काम कोणत्या पद्धतीने झाले हा देखील माहिती अधिकार कार्यकत्यांनी संशोधनाचा विषय हाती घेऊन त्यावर याचिका दाखल करण्याच्या विचारापर्यंत ते येऊन ठेपले आहे.
पाचवे साठवण तळ्याचे स्वप्न दाखवित आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावची विधानसभा निवडणूक दाखवून जिंकली. त्यादृष्टीने त्यांनी कामास गतीही दिली. पण, आता त्यांचे उद्धव ठाकरे सरकार सत्तेत नाही. त्यामुळे तळ्याच्या कामाला पुर्ण क्षमतेने निधी कसा आणायचा? यासाठी ते काय भूमिका घेणार? हे बघणे गरजेचे आहे. दुसरीकडे भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी पालिका निवडणूक जिंकण्यासाठी निळवंडे- शिर्डी- कोपरगाव पाईपलाईन योजनेसाठी 260 कोटी रुपये खर्चाची पाणी योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 2015-16 मध्ये मंजूर करून आणली. पण, त्याचे कामही न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहे.
राज्यात सत्ता शिंदे- फडणवीस यांची सत्ता आल्यामुळे माजी आ. कोल्हे या मुंबई मंत्रालयात हजेरी लावत आहे. औरंगाबाद खंडपीठाने निळवंडे-शिर्डी- कोपरगाव पिण्याच्या पाणी योजनेला हिरवा कंदिल दाखविला. पण, साईबाबा संस्थानने या योजनेचा खडाही उचललेला नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अडचणी आहेत. भूसंपादन प्रक्रिया रखडलेली आहे. त्यामुळे ही योजना अजून आहे तेथेच आहे. निविदा काढली, असे सांगितले जाते; पण पुढे काहीच होताना दिसत नाही.
शहराचा पाणी प्रश्न हा कित्येक वर्षापासून कळीचा मुद्दा बनलेला आहे. पाचवा साठवण तलाव की, निळवंडे- शिर्डी- पाणी योजना, यामध्ये तो अडकलेला आहे. कोपरगावची तृष्णा भागविण्यासाठी आ. आशुतोष काळे व माजी आ. स्नेहलता कोल्हे हे दोघेही प्रयत्नशील आहेत. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नसल्याचे सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे अजून किती वर्षे हा मुद्दा चघळला जाईल, हे येणारा काळच सांगू शकेल.