Latest

कोल्हापूरच्या पर्यटनाची क्षमता लोकप्रतिनिधींना कळणार कधी?

Arun Patil

कोल्हापूर : कोल्हापूरच्या तीर्थक्षेत्र विकासाचा विषय अत्यंत गंभीर आहे. या प्रकल्पामध्ये कोल्हापूरचे अर्थकारण पर्यटनाच्या जोरावर फिरविण्याची मोठी क्षमता आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी दररोज दाखल होणार्‍या भाविकांची संख्या लाखाच्या उंबरठ्याकडे निघाली आहे. नुकत्याच संपलेल्या नवरात्रौत्सवात या संख्येने 40 लाखांच्या आकड्याला स्पर्श केला होता, असे बोलले जाते आहे. पण या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, कोल्हापुरात खिळवून ठेवण्यासाठी कोणतीही योजना अस्तित्वात नाही.

तीर्थस्थानांचे, गडकोट किल्ल्यांचे आणि अभयारण्यांचे समृद्ध पर्यटन उपलब्ध असतानाही तेथे पर्यटकांना पोहोचण्याकरिता ना सुविधा आहेत, ना नियोजन आहे. यामुळेच पर्यटक देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात आणि दर्शन घेऊन माघारी परततात. यामध्ये गाड्यांच्या पार्किंगचे शुल्क मिळण्याखेरीज दुसरा कोणताही निधी उपलब्ध होत नाही. मग असा समृद्ध आराखडा उभा केला गेला, तर कोल्हापूरची अर्थव्यवस्था कितीपटीने उसळी मारू शकेल?

केंद्रीय वाणिज्य आणि पर्यटन मंत्रालयाने अलीकडेच 2022 सालामध्ये देशातील पहिल्या 10 पर्यटनस्थळांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये काही वर्षांपूर्वी पहिल्या स्थानावर असलेल्या गोवा पर्यटनस्थळाला उत्तर प्रदेशातील वाराणसी (काशी) या तीर्थक्षेत्राने लीलया मागे टाकल्याचे म्हटले आहे. 2022 मध्ये गोव्यातील पर्यटकांची संख्या 80 लाख होती, तर वाराणसीला भेट देणार्‍या पर्यटकांनी 7 कोटींचा आकडा ओलांडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीची जणू फेसलिफ्टच झाली आहे. तेथे हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. मग काशीला दर्शनासाठी जाणार्‍या पर्यटकांचा आकडा 7 कोटींवर जात असेल, तर दक्षिण काशीत पर्यटकांना खेचण्याची किती क्षमता असू शकेल? दुर्दैवाने या क्षमतेचे मोजमाप करण्याची क्षमताच आपल्या नेतृत्वाकडे नाही. ज्याने त्याने घातलेल्या चष्म्यातून त्याला मतदारसंघाच्या पलीकडचे दिसत नाही, हे कोल्हापूरचे सर्वात मोठे राजकीय आणि सामाजिक दुखणे आहे.

कोल्हापूरच्या मॉडेल रेल्वेस्थानकाचे दुखणेही तसेच आहे. शाहूंच्या कर्तबगारीने उभारलेल्या इमारतीला हात लावू देणार नाही, म्हणून कोल्हापूरकरांनी आंदोलन उभारले. यातून मॉडेल रेल्वेस्थानक तत्कालीन रेल्वेमंत्री जाफर शरीफ यांनी हा प्रकल्प उचलून आपल्या मतदारसंघात नेला. पण कोल्हापूरकरांनी त्याला पर्याय दिला नाही. म्हणून आज रेल्वेगाड्यांची संख्या वाढण्याऐवजी ती कमीच होते आहे. शेजारच्या बेळगाव, हुबळीतून देशभर जोडणारी विमानसेवा सुरू झाली. पण आमच्याकडे कधी विमानसेवा सुरू, कधी बंद याचे वेळापत्रकच ठरविता येत नाही. (क्रमशः)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT