कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील प्रत्येक शहराला जोडण्यात येईल, अशी ग्वाही नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी दिली. कोल्हापूर – बंगळूर विमानसेवा आजपासून सुरू झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते ऑनलाईन सहभागी झाले होते.
कोल्हापूर विमानतळावर दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, उद्योजक कृष्णराज महाडिक यांनी हिरवा ध्वज दाखवत या सेवेला प्रारंभ केला. खासदार धनंजय महाडिक ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कोल्हापूर-बंगळूर ही विमान सेवा पुढे कोईमतूरपर्यंत विस्तारित आहे. यामुळे कोल्हापूरच्या उद्योगासह पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे म्हणाले, कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आजवर 255 कोटींचा निधी मंजूर केला आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी विमानतळ विकासाला प्राधान्य दिले जाईल. राज्यमंत्री व्ही. के. सिंग म्हणाले, श्री अंबाबाई मंदिरासह अन्य पर्यटन स्थळांसाठीही कोल्हापूर परिचित आहे. भविष्यात कोल्हापूरमधून अधिकाधिक विमानसेवा सुरू होण्यासाठी तसेच अन्य शहरांना जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील.
यावेळी योगेंद्र व्यास या प्रवाशाला पहिला बोर्डिंग पास मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. पहिल्याच दिवशी 112 जणांनी प्रवास केला. यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव एस. के. मिश्रा, इंडिगोचे प्रधान सल्लागार आर. के. सिंग, विमानतळ संचालक अनिल शिंदे इंडिगोचे व्यवस्थापक विशाल भार्गव, नारायण पाटील, वृचिका वेरलाणी आदी उपस्थित होते.