कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : फुलेवाडी रिंगरोड येथील तरुणाला नियोजित वधू दाखविण्याच्या बहाण्याने वधू-वर सुचक सेंटर चालकाने संबंधित तरुणाच्या घरी चोरी करून 5 लाख 54 हजारांच्या 12 तोळे दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या चौकशीतून उघडकीला आला. पोलिसांनी केंद्रचालक रोहन रवींद्र चव्हाण (वय 25, रा. फुलेवाडी) याला अटक केली. त्याच्याकडून दागिने व दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला.
फुलेवाडी रिंगरोड येथील अयोध्या कॉलनीतील विपुल सूर्यकांत चौगुले यांच्या घरी हा प्रकार घडला होता. चोरट्याने तिजोरीतील 120 ग्रॅम सोन्याचे दागिने व अन्य साहित्य लंपास केले होते. करवीर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी चौगुले यांनी यासाठी विशेष पथके नियुक्त केली होती. गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचा फुलेवाडी ते रंकाळा टॉवर रोडवर वावर असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून चव्हाण यास ताब्यात घेतले. अंग झडतीत त्याच्याकडे विपुल चौगुले यांच्या घरातून लुटलेले दागिने आढळून आले.
पोलिसांनी प्रश्नांचा भडिमार करताच संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. रोहन चव्हाण याचे फुलेवाडी परिसरात वधू-वर सुचक सेंटर आहे. फिर्यादी चौगुले याच्यासाठी चव्हाण वधू शोधत होता. त्याने चौगुले यांच्या घराची पाहणी केली होती. मुलगा विपुल घरी नसताना चव्हाण याने त्यांच्या वडिलांना मुलगी दाखविण्यासाठी फुलेवाडी येथील स्वत:च्या कार्यालयात बोलावून घेतले होते. कार्यालयातील उपस्थितांना सरबत आणण्यासाठी म्हणून चव्हाण याने विपुलच्या वडिलाकडून सायकलीची चावी मागून घेतली. चाव्यांच्या जुडग्यातील घराची चावी त्याने नळकतपणे काढून घेत त्याने चौगुले यांचे घर गाठले. घरात प्रवेश करून कपाटातील दागिन्यांवर डल्ला मारला. त्यानंतर लगेच स्वत:च्या कार्यालयात परतला. चौगुले कुटुंबीय गावाकडून परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले.