राशिवडे; पुढारी वृत्तसेवा : शेळेवाडी (ता. राधानगरी) येथील माध्यमिक शाळेतील मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन चुकीचे वर्तन करणाऱ्या विजयकुमार परशुराम बागडी (वय ५२, मुळ गाव सोळांकुर, ता. राधानगरी, सध्या रा. फुलेवाडी रिंगरोड या शिक्षका विरूद्ध मुख्याध्यापक प्रभाकर भुपाल कोले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर दोन तासातच उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी या शिक्षकाला अटक केली. या प्रकरणामुळे संपुर्ण जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहीती अशी की, शेळेवाडी येथील माध्यमिक शाळेतील पंधरा ते सोळा वयोगटातील सात मुलींसोबत महिनाभरापुर्वी येथील शिक्षकाने चुकीचे वर्तन केले होते. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी संबधित संस्थेकडे तक्रार केली होती. यावरून संबंधीत शिक्षक बागडीची बदली करण्यात आली.
त्यानंतर समुपदेशन करण्यासाठी गेलेल्या गीता हसूरकर यांना पीडित मुलींनी घडलेल्या प्रकाराची माहीती दिली. मुलींच्या धाडसी वृतीमुळे या प्रकरणाला वाचा फुटली. मुख्याध्यापक प्रभाकर कोले यांनी आज (मंगळवार) सकाळी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार दिली. यानंतर शिक्षक बागडीस अटक करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनुराधा पाटील करत आहेत.
हेही वाचा :